निलायम कृष्णकक्ष येथे सुप्रसिद्ध अभिवाचन अनुभव कार्यक्रम; वैशाली पंडित यांच्या संकल्पना व लेखणीतून साकारणार आगळा सांस्कृतिक सोहळा
मालवण (प्रतिनिधी) : कोजागिरी पौर्णिमेच्या चांदण्यांनी आसमंत उजळून निघालेला असताना, कथा, कविता, संवाद आणि अभिनयाच्या माध्यमातून त्या चंद्रप्रकाशाला शब्दांचे रूप देणारा आगळा अनुभव कणकवलीत रसिकांना घेता येणार आहे. ‘उत्तरचंद्राची कोजागिरी’ या सुप्रसिद्ध अभिवाचन अनुभव कार्यक्रमाचे आयोजन रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी कणकवली हळवल येथील निलायम कृष्णकक्ष येथे करण्यात आले आहे.
कोजागिरीच्या निमित्ताने होणारा हा कार्यक्रम केवळ अभिवाचनापुरता मर्यादित नसून, शब्द, अभिनय, संगीत आणि भावनांचा सुरेल मिलाफ अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. आपल्या संस्कृतीतील कोजागिरीच्या चंद्रप्रकाशाला साहित्यिक आणि कलात्मक अभिव्यक्तीची जोड देत हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
वैशाली पंडित यांच्या संकल्पनेतून साकार
‘उत्तरचंद्राची कोजागिरी’ या कार्यक्रमाची संकल्पना आणि संहिता लेखन ज्येष्ठ लेखिका वैशाली पंडित यांचे आहे. कार्यक्रमात आजीच्या भूमिकेत स्वतः वैशाली पंडित, आजोबांच्या भूमिकेत संजय शिंदे, सूत्रधार म्हणून अक्षय सातार्डेकर, सहकलाकार म्हणून डॉ. सुमेधा नाईक यांचा सहभाग असून तालवाद्याची साथ वैभव मांजरेकर देणार आहेत.
अनुभवी कलाकारांचे अभिवाचन, संवादफेक, अभिनय आणि तालवाद्यांची साथ यामुळे कार्यक्रमाला वेगळी रंगत प्राप्त होणार आहे. साहित्य आणि रंगकलेच्या माध्यमातून मानवी नात्यांमधील हळवे पदर उलगडत जाणारा हा अनुभव रसिकांसाठी विशेष ठरणार आहे.
‘आपली सिंधुनगरी न्यूज’ची निर्मिती व प्रस्तुती
‘आपली सिंधुनगरी न्यूज’ चॅनेलची निर्मिती व प्रस्तुती असलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक उपक्रमाला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रम म्हणून करण्यात आले आहे. कोकणातील साहित्य, कला आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीला व्यासपीठ मिळावे, या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन स्वर्गानंद टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्सच्या डॉ. वैशाली कोरगांवकर आणि गीता कामत यांच्या वतीने करण्यात आले आहे.
रसिकांसाठी प्रवेशिका १०० रुपये
रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी कणकवली हळवल येथील निलायम कृष्णकक्ष येथे हा कार्यक्रम रंगणार आहे. कार्यक्रमासाठी प्रवेशिका १०० रुपये असून अधिक माहितीसाठी ९४२२०४३०२५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोजागिरीच्या चंद्रप्रकाशात शब्दांचा उजेड, आठवणींची ऊब, नात्यांची गुंफण आणि कलाविष्काराचा अनुभव देणारी ‘उत्तरचंद्राची कोजागिरी’ रसिकांसाठी एक वेगळीच सांस्कृतिक पर्वणी ठरणार आहे.












