विद्यार्थी गटात प्राची काळे, तर खुल्या गटात शिवम कविटकर प्रथम
रत्नागिरी : मराठी विज्ञान परिषदेतर्फे आयोजित राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, विद्यार्थी गटात प्राची सचिन काळे यांनी, तर खुल्या गटात शिवम राजेश कविटकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. विद्यार्थी गटासाठी ‘घरातील रसायनशास्त्र’, तर खुल्या गटासाठी ‘युद्धाचे हवामानावर परिणाम’ हा निबंधाचा विषय देण्यात आला होता.
या राज्यस्तरीय स्पर्धेला मुंबई, मुंबई उपनगर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी गटातून एकूण १४१, तर खुल्या गटातून ५९ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
विद्यार्थी गटासाठी ऋणा नागवेकर आणि अजय ठिक (अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय), तर खुल्या गटासाठी डॉ. दीप्ती जाधव आणि परेश गुरव (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
विद्यार्थी गटात प्राची सचिन काळे (एल. टी. इंग्लिश मीडियम स्कूल, खेड, जि. रत्नागिरी) यांनी प्रथम, तर दिव्या जयंत गावकर (शिवडाव माध्यमिक विद्यालय, शिवडाव, जि. सिंधुदुर्ग) यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.
खुल्या गटात शिवम राजेश कविटकर (मु. पो. महादेवाचे केरवडे, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) यांनी प्रथम, तर देवयानी सुनील जोशी (आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालय, देवरुख, जि. रत्नागिरी) यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
विजेत्या स्पर्धकांना मुंबई व कोकण विभागाच्या वतीने मराठी विज्ञान परिषदेतर्फे प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
स्पर्धेचे समन्वयक म्हणून गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील डॉ. उमेश संकपाळ यांनी काम पाहिले. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि स्पर्धकांचे विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी अभिनंदन केले.










