मालवण (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक संचलनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने ओरोस येथे आयोजित जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरचा विद्यार्थी आरव दत्तात्रय पाटील याने दमदार कामगिरी करत १४ वर्षांखालील ३५ किलो वजनी गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.
आरवच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची सातारा येथे होणाऱ्या विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या यशामुळे न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धेत आरवने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने हे यश मिळविले. त्याच्या या कामगिरीबद्दल माध्यमिक शिक्षण संस्था पेंडूर तसेच न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरच्या वतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी आरवचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
आरवच्या यशामागे त्याची सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि चिकाटीसोबतच प्रशिक्षक व मार्गदर्शकांचे मोलाचे मार्गदर्शन असल्याचे सांगण्यात आले.
या यशाबद्दल संस्था अध्यक्ष बाबाराव राणे, सचिव घनश्याम राणे, संस्था संचालक सदाशिव परब, सुभाष सावंत, प्रदीप सावंत, अनिल सावंत, आतिक शेख, सत्यवान सावंत, संतोष पवार, विजय गावडे, मुख्याध्यापक सुरेश तावडे, आजी-माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आरवचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.












