सुट्टीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गांवर वाहनांची वाढती संख्या; वाहतूक नियोजनाची मागणी
मालवण (प्रतिनिधी)
मालवणमध्ये पर्यटन हंगामाला सुरुवात होताच पर्यटकांची मोठी गर्दी वाढली असून त्याचा परिणाम शहरातील वाहतूक व्यवस्थेवर जाणवू लागला आहे. २ ते ४ ऑक्टोबरच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने पर्यटक मालवणात दाखल झाले आहेत. पर्यटकांच्या वाहनांची संख्या वाढल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर वारंवार वाहतूक कोंडी होत असून, स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
मालवणात दाखल झालेले पर्यटक किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासह विविध वॉटरस्पोर्ट्सचा आनंद घेत आहेत. त्यामुळे बंदर परिसर तसेच शहरातील प्रमुख मार्गांवर वाहनांची मोठी वर्दळ दिसून येत आहे. भरड नाका, बाजारपेठ परिसर, एसटी बसस्थानक रस्ता, देऊळवाडा नाका तसेच बंदर-जेटी मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
विशेषतः पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहनांची संख्या वाढल्याने वाहतुकीचा वेग मंदावत आहे. काही ठिकाणी वाहनांच्या रांगा लागत असल्याने स्थानिक नागरिकांना दैनंदिन कामांसाठी ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पर्यटन हंगामाला आता सुरुवात झाली असून आगामी काळात मालवणात पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख वाहतूक मार्गांवर पोलीस कर्मचारी तैनात करावेत, गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण करावे तसेच वाहनांच्या पार्किंगचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळत असली, तरी वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.











