कोळंब ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांचा संयुक्त पुढाकार; पाणीसाठा वाढण्यास होणार मदत
मालवण (प्रतिनिधी) : कोळंब ग्रामपंचायत आणि कातवड परिसरातील ग्रामस्थांच्या संयुक्त पुढाकारातून कातवड ब्राह्मण मंदिराजवळ वनराई बंधारा उभारण्यात आला. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा स्थानिक पातळीवर उपयोग व्हावा तसेच परिसरातील पाण्याची उपलब्धता वाढावी, या उद्देशाने ग्रामस्थांनी श्रमदानातून हा उपक्रम राबविला.
शनिवारी सकाळी ८ वाजल्यापासून ग्रामस्थ एकत्र आले आणि वनराई बंधारा उभारणीच्या कामाला सुरुवात केली. ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान करत बंधाऱ्याचे काम पूर्ण केले. या उपक्रमात कोळंबच्या सरपंच सिया धुरी, ग्रामपंचायत सदस्य मंगेश चव्हाण, ग्रामसेवक, तलाठी तसेच कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला.
वनराई बंधाऱ्यामुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा साठा वाढण्यास मदत होणार आहे. यामुळे परिसरातील भूजलपातळी वाढण्यास तसेच शेती आणि इतर स्थानिक गरजांसाठी पाण्याची उपलब्धता सुधारण्यास हातभार लागण्याची अपेक्षा आहे.
सध्या अनेक भागांत पाण्याची उपलब्धता हा महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. अशा परिस्थितीत स्थानिक पातळीवर ग्रामस्थांच्या सहभागातून वनराई बंधारे उभारल्यास पावसाच्या पाण्याचे संवर्धन करण्यास मदत होते. कोळंब-कातवड परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून राबविलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.











