मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. एसटीच्या ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’ योजनेतील पास आता ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना पास काढण्यासाठी आगारात जाऊन रांगेत उभे राहण्याची किंवा हस्तलिखित पद्धतीने पास काढण्याची गरज राहणार नाही. घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने पास मिळवता येणार आहे.
एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने २९ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या ४ आणि ७ दिवसांच्या पाससाठी ऑनलाइन कार्यप्रणाली सुरू करण्यात आली आहे. महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळासह मोबाईल ॲप्लिकेशनवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ऑनलाइन पास काढताना प्रवाशांना आवश्यक माहिती भरावी लागणार असून, त्यानंतर नियमानुसार पास उपलब्ध होईल. प्रवाशाला मिळालेला पास प्रिंट स्वरूपात किंवा मोबाईलमधील PDF स्वरूपात दाखवता येणार आहे. त्यामुळे पास खरेदीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.
QR कोडद्वारे पासची तपासणी
ऑनलाइन पद्धतीने मिळणाऱ्या पासवर QR कोड देण्यात येणार आहे. प्रवासाच्या वेळी वाहकाकडील ईटीआयएम मशीनद्वारे हा QR कोड स्कॅन करून पासची तपासणी केली जाईल. QR कोड स्कॅन केल्यानंतर प्रवाशाचे नाव, पासचा प्रकार, पासची वैधता आणि इतर आवश्यक माहिती ईटीआयएम मशीनवर प्रदर्शित होणार आहे.
यासोबतच प्रवाशाने दाखविलेल्या ओळखपत्राचीही पडताळणी केली जाणार आहे. पास आणि ओळखपत्राची तपासणी पूर्ण झाल्यानंतरच संबंधित प्रवाशाला प्रवासाची परवानगी दिली जाईल.
आगारातील रांगा कमी होणार
ऑनलाइन पास सुविधेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून आगारांमधील गर्दी आणि रांगा कमी होण्यास मदत होणार आहे. विशेषतः सुट्टीचा काळ आणि पर्यटन हंगामात या सुविधेचा प्रवाशांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’ योजनेचे डिजिटल रूपांतर करत एसटी महामंडळाने पासची सुविधा थेट प्रवाशांच्या मोबाईलपर्यंत पोहोचवली आहे. त्यामुळे एसटीचा प्रवास अधिक सुलभ, आधुनिक आणि पारदर्शक करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.











