शिक्षण क्षेत्रातील ३५ वर्षांच्या उल्लेखनीय कार्याची दखल; पद्मश्री डॉ. तात्यासाहेब लहाने यांच्या हस्ते सन्मान
मुंबई : चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील टेरव गावचे सुपुत्र तथा मुंबईतील सरस्वती कोचिंग क्लासेसचे प्राचार्य व संचालक अजित आबाजीराव कदम यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार’ (Education Excellence Award) प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशन (MCOA) यांच्या वतीने आयोजित सोहळ्यात पद्मश्री डॉ. तात्यासाहेब लहाने यांच्या हस्ते अजित कदम यांचा गौरव करण्यात आला.
शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी दादर (पूर्व), मुंबई येथील किंग जॉर्ज ऑडिटोरियममध्ये MCOA शिक्षक दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित कदम यांच्यासह सरस्वती कोचिंग क्लासेसचाही गौरव करण्यात आला.
अजित कदम यांनी गेल्या ३५ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि समर्पित कार्य केले आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासोबतच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देणे, संस्कारक्षम व्यक्तिमत्त्व घडवणे आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची पुरस्काराच्या माध्यमातून दखल घेण्यात आली.
अजित कदम यांच्या नेतृत्वाखाली सरस्वती कोचिंग क्लासेसने गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळात गुणवत्तापूर्ण, विद्यार्थीकेंद्रित आणि सातत्यपूर्ण शिक्षणपद्धतीच्या माध्यमातून मुंबईच्या शैक्षणिक क्षेत्रात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. संस्थेच्या वाटचालीत अजित कदम यांची दूरदृष्टी, अथक परिश्रम आणि शिक्षणाप्रती असलेली निष्ठा महत्त्वाची ठरली आहे.
या पुरस्कारामुळे अजित कदम यांच्यासह सरस्वती कोचिंग क्लासेसच्या संपूर्ण परिवाराचा गौरव झाला आहे. या सन्मानामुळे संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्थेच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या सर्व सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान, टेरव गावच्या सुपुत्राचा शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल गौरव झाल्याने टेरव, चिपळूण तसेच दसपटी विभागातून अजित कदम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कुलस्वामिनी आई भवानी रामवरदायिनी आणि वाघजाई मातेच्या आशीर्वादाने त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याला यापुढेही नवी ऊर्जा, यश आणि कीर्ती लाभो, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.










