१७ व १९ वर्षांखालील मुलांच्या दोन्ही गटात सोलापूरच्या वेदांत खालाडेचे विजेतेपद; मुलींच्या गटात गीत जगताप, अनन्या जोशी विजयी
मालवण (प्रतिनिधी) : महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली मालवण-कुंभारमाठ येथे आयोजित करण्यात आलेल्या कोकण-पश्चिम महाराष्ट्र विभागीय टेबलटेनिस स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत सोलापूरच्या वेदांत खालाडे याने १७ व १९ वर्षांखालील मुलांच्या दोन्ही गटांत विजेतेपद पटकावले. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात कोल्हापूरच्या गीत जगताप, तर १९ वर्षांखालील मुलींच्या गटात कोल्हापूरच्या अनन्या जोशी यांनी विजेतेपद मिळविले.
कुंभारमाठ येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजजवळील माघी गणेश हॉल येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र टेबल टेनिस असोसिएशनचे खजिनदार तथा कोकण-पश्चिम महाराष्ट्र विभागीय टेबलटेनिस स्पर्धेचे अध्यक्ष संजय कडू, मॅनेजिंग कमिटी सदस्य तथा रत्नागिरी जिल्हा टेबलटेनिस असोसिएशनचे अध्यक्ष अजित गाळवणकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन, सिंधुदुर्गचे अध्यक्ष विष्णू कोरगावकर, सचिव हेमंत वालकर, उपाध्यक्ष किरण पिंगुळकर, सहसचिव दीपक जाधव, विलास परुळेकर, दिलीप हुनारी, सतीश पिंगळे, पी. एस. शिंदे, नितीन तळेकर, पंकज पेडणेकर, गुरुनाथ राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या विभागीय स्पर्धेत कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या आठ जिल्ह्यांतील खेळाडू, प्रशिक्षक, पंच तसेच क्रीडा अधिकारी सहभागी झाले होते. त्यामुळे स्पर्धेला चांगलीच रंगत आली.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी १७ वर्षांखालील मुले व मुली तसेच १९ वर्षांखालील मुले व मुली या चार गटांतील सामने पार पडले. त्यात १७ वर्षांखालील मुलांच्या गटात सोलापूरच्या वेदांत खालाडे याने विजेतेपद मिळविले, तर कोल्हापूरच्या जुनेद मगदूम याने उपविजेतेपद पटकावले.
१७ वर्षांखालील मुलींच्या गटात कोल्हापूरच्या गीत जगताप हिने विजेतेपद, तर सिंधुदुर्गच्या वर्षा परुळेकर हिने उपविजेतेपद मिळविले. १९ वर्षांखालील मुलांच्या गटात पुन्हा एकदा वेदांत खालाडे याने बाजी मारत विजेतेपद मिळविले. सोलापूरच्याच अवधूत चौधरी याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
१९ वर्षांखालील मुलींच्या गटात कोल्हापूरच्या अनन्या जोशी हिने विजेतेपद मिळविले, तर निहाली पाटील हिने उपविजेतेपद पटकावले.
या चारही गटांतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंचे बक्षीस वितरण मालवणी कवी रुजारिओ पिंटो, संजय कडू, विष्णू कोरगावकर आणि दिलीप हुनारी यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या खेळाडूंना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील निकाल :
- १७ वर्षांखालील मुले : विजेता – वेदांत खालाडे (सोलापूर); उपविजेता – जुनेद मगदूम (कोल्हापूर)
- १७ वर्षांखालील मुली : विजेती – गीत जगताप (कोल्हापूर); उपविजेती – वर्षा परुळेकर (सिंधुदुर्ग)
- १९ वर्षांखालील मुले : विजेता – वेदांत खालाडे (सोलापूर); उपविजेता – अवधूत चौधरी (सोलापूर)
- १९ वर्षांखालील मुली : विजेती – अनन्या जोशी (कोल्हापूर); उपविजेती – निहाली पाटील (कोल्हापूर)












