सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलनात होणार गौरव; साहित्य, पत्रकारिता आणि संपादन क्षेत्रातील कार्याची दखल
मालवण (प्रतिनिधी) : साहित्य, लेखन, कादंबरी आणि पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत आपल्या लेखणीचा ठसा उमटवणारे मालवणचे साहित्यिक सुयोग पंडित यांचा त्यांच्या उल्लेखनीय साहित्यिक योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात येणार आहे. येत्या २८ नोव्हेंबर रोजी आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलन २०२६ मध्ये हा गौरव सोहळा पार पडणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या अनुदानातून बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या २८ नोव्हेंबर रोजीच्या सायंकाळी ४ नंतरच्या सत्रात सुयोग पंडित यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
साहित्यिक, लेखक, कादंबरीकार, संपादक आणि पत्रकार म्हणून सुयोग पंडित यांनी केलेल्या कार्याची या निमित्ताने दखल घेतली जाणार आहे. त्यांच्या साहित्यिक योगदानाचा सन्मान करणाऱ्या या सोहळ्याला बॅरिस्टर नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर यांच्यासह राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मालवणच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरणाऱ्या या सत्कारामुळे सुयोग पंडित यांच्या साहित्यिक वाटचालीला विशेष सन्मान लाभणार आहे.












