‘एक व्यक्ती, एक पद’ धोरणाची अंमलबजावणी; नऊ जिल्हा परिषद विभागांसाठी प्रभारी नियुक्त
मालवण (प्रतिनिधी) : कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची संघटनात्मक ताकद गावपातळीपर्यंत अधिक भक्कम करण्यासाठी पक्षाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. येत्या २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत शिवसेनेतर्फे ‘पुनर्रचना सप्ताह’ राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान संघटनेत व्यापक फेरबदल करण्यात येणार असून, नवीन आणि कार्यक्षम कार्यकर्त्यांना पदांची संधी देण्यावर भर दिला जाणार आहे.
आमदार नीलेश राणे यांच्या आमदारकीच्या दोन वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा घेण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या संघटनात्मक पुनर्रचनेची घोषणा करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, काका कुडाळकर, दिनेश साळगावकर, सभापती मिलिंद नाईक, संजय भोगटे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या पुनर्रचना सप्ताहात पक्षाच्या ‘एक व्यक्ती, एक पद’ या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे एकाच व्यक्तीकडे अनेक पदे राहण्याऐवजी संघटनेत नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. तालुका आणि शहर पातळीवरील पदांमध्येही बदल होण्याची शक्यता असून, कोणाला जबाबदारी मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
नऊ जिल्हा परिषद विभागांसाठी प्रभारी नियुक्त
संघटनात्मक बांधणीच्या पहिल्या टप्प्यात कुडाळ-मालवण मतदारसंघातील नऊ जिल्हा परिषद विभागांसाठी प्रभारींची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये आंब्रड विभागासाठी देवेंद्र नाईक, माणगावसाठी दिनेश साळगावकर, तेंडोलीसाठी आनंद शिरवलकर, वेताळ बांबर्डेसाठी मिलिंद नाईक, नेरूरसाठी अरविंद करलकर, ओरोससाठी निखिल कांदळगावकर, पावशीसाठी संजय भोगटे, घावनाळेसाठी दत्ता कोरगावकर आणि पिंगुळीसाठी अनिकेत तेंडुलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका कुडाळकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
गावोगावी बूथ बैठका; संघटना मजबूत करण्यावर भर
पुनर्रचना सप्ताहादरम्यान नवनियुक्त विभागप्रमुख प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन बूथस्तरावर बैठका घेणार आहेत. स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षाची संघटनात्मक स्थिती जाणून घेणे, कार्यकर्त्यांना सक्रिय करणे आणि प्रत्येक बूथवर पक्षाचे संघटन मजबूत करणे, यावर भर दिला जाणार आहे.
कुडाळ-मालवण मतदारसंघात शिवसेनेच्या संघटनेला नव्याने बळ देण्याच्या दृष्टीने हा सप्ताह महत्त्वाचा मानला जात आहे. नऊ विभागांतील नियुक्त्यांनंतर आता तालुकाप्रमुख आणि शहरप्रमुख पदांवर कोणाची वर्णी लागणार, जुन्या पदाधिकाऱ्यांना कायम ठेवले जाणार की नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे २६ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पुनर्रचना सप्ताहाकडे शिवसैनिकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.










