विलास गणपत मुणगेकर यांच्याविरोधात कारवाई; परिविक्षाधीन डीवायएसपी दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखाली पथकाची धडक
मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यात गोवा बनावटीच्या दारूची अवैध विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. रेवतळे येथे रविवारी (२२ नोव्हेंबर) रात्री छापा टाकून पोलिसांनी तब्बल १ लाख ५८ हजार रुपये किमतीचा गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त केला. या प्रकरणी रेवतळे येथील विलास गणपत मुणगेकर यांच्याविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे.
रेवतळे परिसरात गोवा बनावटीची दारू अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. तपासणीदरम्यान १ लाख ५८ हजार रुपये किमतीचा दारूसाठा आढळून आला. पोलिसांनी हा साठा जप्त केला असून, संबंधित व्यक्तीविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
पोलीस अधीक्षक मोहन दहीकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक आशिष भगत, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत भोसले, हेड कॉन्स्टेबल हुंबे आणि हेड कॉन्स्टेबल पेडणेकर यांचा समावेश होता.
अवैध दारूविक्रीविरोधात कारवाईचे सत्र
मालवण शहर आणि तालुक्यात गोवा बनावटीच्या दारूची अवैध विक्री व साठवणूक रोखण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने छापेमारी केली जात आहे. रेवतळे येथील कारवाईमुळे पुन्हा एकदा अवैध मद्यव्यवसायाचा मुद्दा चर्चेत आला आहे. जप्त केलेल्या दारूसाठ्याच्या स्रोताबाबत तसेच या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलिसांचा पुढील तपास महत्त्वाचा ठरणार आहे.











