कार्तिकोत्सवात सात स्थानिक संघांचा सहभाग; गौळणी आणि अभंगांच्या सादरीकरणातून संतपरंपरेचा जागर
मालवण (प्रतिनिधी) : कृष्णभक्तीचा आनंद, संतविचारांचा जागर आणि लोककलेचा सुरेल संगम… अशा भक्तिमय वातावरणात आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या कार्तिकोत्सव २०२६ निमित्त आयोजित ‘नाचू दे गौळण, गावूया अभंग’ हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. सोमवारी रात्री पालखी सोहळ्यानंतर श्री रामेश्वर मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात दशक्रोशीतील सात स्थानिक संघांनी सहभाग घेत गौळणी आणि अभंगांच्या सादरीकरणातून उपस्थितांना भक्तिरसात चिंब केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी देवस्थानचे वर्सलदार महादेव मिराशी यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी अनिल करंजे यांनी पाणी बचत आणि संवर्धनाचे महत्त्व विशद केले. त्यानंतर प्रत्यक्ष सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. श्री विठ्ठल रखुमाई आचरा देऊळवाडी येथील लहान मुलींनी ध्वनिफितीच्या माध्यमातून गौळण आणि अभंग सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
परडेकर मित्रमंडळ आचरा यांनी ‘गौळणी संगती गाऱ्हाणी’ आणि ‘तुझा माझा देवा कारे वैराकार’, निरंकारी महापुरुष त्रिंबक यांनी ‘कान्होबा रे तू माझा’ आणि ‘का रे देवा माझा तुझा’, तर साई समर्थ ग्रुप आचरा यांनी ‘घागर घेवून निघाली’ आणि ‘खेळ मांडियेला वाळवंटी’ या गौळण-अभंगांच्या जोडीने भक्तिरसाची रंगत वाढवली.
श्री बाळगोपाळ मंडळ आचरा वरचीवाडी यांनी ‘कान्हा माझी घागर गेली’ आणि ‘लागलीसी आस मजला’, श्री ब्राह्मणदेव आचरा पारवाडी यांनी ‘कृष्ण सख्याची बाधा’ आणि ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’, तर श्री विठ्ठल रखुमाई आचरा यांनी ‘कशी मी जाऊ मथुरे बाजारी’ आणि ‘कानडा राजा पंढरीचा’ या सादरीकरणातून रसिकांची दाद मिळवली. गौळणींतून कृष्णलीलेचा आनंद, तर अभंगांतून संतांच्या विचारांचा संदेश अशा दोन्ही भक्तिपरंपरांचा सुंदर आविष्कार यावेळी अनुभवायला मिळाला.
या कार्यक्रमाला आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, चावल मुजावर, कमल परुळेकर, पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर, आशिष बागवे, अभय भोसले, अजित घाडी, गीता चंद्रा नायर, महेश राणे, चंदू कदम, रवींद्र गुरव, मांगरीश सांबारी, कपिल गुरव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी आबा सावंत, संदीप नलावडे, शेखर मोर्वेकर, संतोष कोदे, जयप्रकाश परुळेकर, रवींद्र पाटील, गुरुप्रसाद कांबळी, प्रफुल्ल घाडी, विनोद पाडावे, पंकज आचरेकर आणि गजू गावकर यांनी प्रायोजक म्हणून सहकार्य केले. सहभागी झालेल्या सातही संघांना प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ देतानाच त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश भिरंवडेकर यांनी केले.
गौळणींचा ठेका, अभंगांचे सूर आणि भक्तीचा गंध यांतून आचऱ्याच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम कार्तिकोत्सवातील विशेष आकर्षण ठरला.












