अतुल काळसेकर यांच्या हस्ते शासकीय पूजन; पुण्यक्षेत्र मोरयाचा धोंडा स्मारक स्वरूपात विकसित करण्यासाठी पाठपुरावा
मालवण (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीची आणि सागरी दुर्गनिर्मितीच्या ऐतिहासिक संकल्पनेची साक्ष देणाऱ्या मालवण येथील पुण्यक्षेत्र श्री मोरयाचा धोंडा येथे किल्ले सिंधुदुर्गच्या पायाभरणीचा ३६२ वा वर्धापन दिन सोहळा २५ नोव्हेंबर २०२६ रोजी भक्तिभावाने आणि शिवप्रेमींच्या उत्स्फूर्त उपस्थितीत साजरा करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या हस्ते शासकीय पूजन करण्यात आले. यावेळी मोरयाचा धोंडा या ऐतिहासिक पाषाणाचे महत्त्व, त्याच्याशी निगडित परंपरा, भौगोलिक वैशिष्ट्ये आणि आध्यात्मिक संदर्भ यांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
शासकीय पूजेच्या वेळी तहसीलदार गणेश लव्हे आणि परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक शेलार सहभागी झाले होते. शिवकालीन पुरोहित अभ्यंकर कुटुंबीयांचे वंशज रविकिरण आपटे यांनी ३६२ व्या शासकीय पूजेचे पौरोहित्य केले. शिवप्रेमी भाऊ सामंत यांनी उपस्थितांसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्तुतिपर रचना आणि प्रार्थनेचे पठण केले. पूजा संपन्न झाल्यानंतर सागराला श्रीफळ अर्पण करण्यात आले. यावेळी मोरयाच्या परिसरातील विकासासह शिवप्रेमींच्या ऐतिहासिक आस्थेचा हा ठेवा स्मारक स्वरूपात जतन व्हावा, तसेच सर्वांच्या सुख, शांती, समाधान आणि समृद्धीसाठी विशेष गाऱ्हाणे घालण्यात आले.
मोरयाचा धोंडा स्मारक स्वरूपात विकसित करणार!
यावेळी अतुल काळसेकर यांनी पुण्यक्षेत्र श्री मोरयाचा धोंडा परिसराच्या विकासाबाबत भूमिका मांडली. शिवप्रेमी आणि स्थानिक नागरिकांच्या अपेक्षेनुसार या ऐतिहासिक स्थळाचा स्मारक स्वरूपात विकास व्हावा, यासाठी शासन आणि प्रशासन स्तरावर जोरदार पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या पाठपुराव्यामुळे लवकरच या परिसराचा कायापालट होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दूरदृष्टीने ओळखलेल्या मोरयाचा धोंडा या ऐतिहासिक स्थळावरील विविध धार्मिक, आध्यात्मिक आणि भौगोलिक प्रतीकात्मक चिन्हांचे महत्त्व जतन होणे आवश्यक आहे. या ठिकाणाचे ऐतिहासिक महत्त्व पुढील पिढ्यांनाही समजावे आणि हा वारसा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरावा, असे काळसेकर म्हणाले.
ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी प्रशासनाची भूमिका
तहसीलदार गणेश लव्हे यांनी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या श्री क्षेत्र मोरयाचा धोंडा येथील शासकीय पूजेत सहभागी होता आल्याबद्दल प्रशासनाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली. किल्ले प्रेरणोत्सव समितीचे सदस्य आणि शिवप्रेमींच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांच्या स्मृतींना उजाळा देत हा सोहळा पार पडला.
यावेळी नगरसेविका अन्वेषा आचरेकर, स्वीकृत नगरसेवक रविकिरण तोरसकर, दत्ता नेरकर, सूर्यकांत फणसेकर, हेमंत वालकर, नारायण धुरी, माजी नगरसेविका जयमाला मयेकर, प्रदीप वेंगुर्लेकर, दादा वेंगुर्लेकर, किसन मांजरेकर, सुंदर चांदेरकर, सिद्धेश तेंडुलकर यांच्यासह किल्ले प्रेरणोत्सव समितीचे सदस्य आणि मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
किल्ले सिंधुदुर्गच्या पायाभरणीच्या स्मृती जपणारा मोरयाचा धोंडा हा मालवणच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अस्मितेचा महत्त्वाचा ठेवा आहे. केवळ वार्षिक पूजनापुरते या स्थळाचे महत्त्व मर्यादित न राहता त्याचा इतिहास, धार्मिक परंपरा आणि भौगोलिक वैशिष्ट्ये पुढील पिढ्यांसमोर यावीत, यासाठी या परिसराचा स्मारक स्वरूपातील विकास महत्त्वाचा ठरणार आहे.












