मालवण-तारकर्लीच्या सुपुत्राचा क्रीडा क्षेत्रात दमदार ठसा; सोनी स्पोर्ट्सवर दिसणार पंचगिरीचा अनुभव
मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील तारकर्ली गावचे सुपुत्र गोविंद ऊर्फ बंटी केरकर यांनी क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. बेंगळुरू येथे आयोजित करण्यात येणाऱ्या इंडियन सॉफ्टबॉल क्रिकेट लीगच्या (ISCL) दुसऱ्या पर्वासाठी पंच म्हणून त्यांची निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे मालवणसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, कोकणच्या क्रीडा क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
इंडियन सॉफ्टबॉल क्रिकेट लीगचे दुसरे पर्व २५ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत बेंगळुरू येथील प्रसिद्ध आचार्य स्टेडियमवर रंगणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत भारतातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमधून निवडलेले एकूण ३२ संघ सहभागी होणार आहेत. देशभरातील प्रतिभावान खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी देणाऱ्या या स्पर्धेत पंच म्हणून काम करण्याची संधी बंटी केरकर यांना मिळाली आहे.
या स्पर्धेला भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंचेही आकर्षण लाभले आहे. भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि ‘मिस्टर आयपीएल’ म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना तसेच भारताचा माजी स्टार फिरकीपटू हरभजन सिंग हे या स्पर्धेचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत. त्यामुळे या लीगकडे देशभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
बंटी केरकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिकेट क्षेत्रातील परिचित नाव आहे. गेली अनेक वर्षे मालवणसह जिल्ह्यात आयोजित होणाऱ्या विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये त्यांनी पंच म्हणून जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. खेळाचे नियम, मैदानावरील निर्णयक्षमता आणि पंचगिरीतील अनुभव यांच्या जोरावर त्यांनी जिल्हास्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. यापूर्वी कर्नाटक सॉफ्टबॉल क्रिकेट लीगमध्येही त्यांनी पंच म्हणून कामगिरी बजावली आहे. या अनुभवाच्या बळावर आता त्यांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे.
विशेष म्हणजे, ISCL मधील सामन्यांचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स या राष्ट्रीय क्रीडा वाहिनीवरून केले जाणार आहे. त्यामुळे मालवणच्या बंटी केरकर यांची पंचगिरी राष्ट्रीय स्तरावर क्रिकेटप्रेमींना पाहता येणार आहे. तारकर्लीसारख्या गावातून सुरू झालेला त्यांचा क्रिकेटमधील प्रवास आता राष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचल्याने स्थानिक क्रीडाप्रेमींसाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.
ग्रामीण भागातील गुणवत्ता, सातत्यपूर्ण मेहनत आणि खेळाप्रती असलेली निष्ठा यांना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळू शकते, याचे बंटी केरकर हे उत्तम उदाहरण ठरले आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, आगामी स्पर्धेतील त्यांच्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.











