गवंडीवाडा परिसरासह सोमवारच्या आठवडा बाजारात नागरिकांशी साधला संवाद
मालवण (प्रतिनिधी) : निवडणुकीतील कथित मतचोरीचा मुद्दा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे मालवण शहरातील गवंडीवाडा येथे सोमवारी चावडी बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या माध्यमातून काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मतचोरीच्या मुद्द्यांची माहिती दिली. यावेळी या विषयासंदर्भातील पत्रकांचे नागरिकांना वाटप करण्यात आले.
प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार, काँग्रेसचे लोकसभा प्रभारी शशांक बावचकर, जिल्हा प्रभारी हुस्नबानो खलिपे आणि कुडाळ विधानसभा प्रभारी गौस खतीब यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या उपस्थितीत गवंडीवाडा येथे चावडी बैठक पार पडली.
सोमवारी मालवणचा आठवडा बाजार असल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी वर्दळ होती. या संधीचा उपयोग करून काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गवंडीवाडा परिसर तसेच बाजारपेठेत नागरिकांशी संवाद साधला. निवडणुकीतील मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कथित मतचोरी कशी आणि कोणत्या पद्धतीने झाली, याबाबत राहुल गांधी यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा समावेश असलेली पत्रके नागरिकांना देण्यात आली. या माध्यमातून काँग्रेसने मतचोरीचा मुद्दा जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
या चावडी बैठकीला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद मोंडकर, जिल्हा उपाध्यक्ष मेघनाद धुरी, जिल्हा सरचिटणीस डॉ. विवेक रायकर, मालवण तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सरदार ताजर, तालुका सरचिटणीस महेंद्र मांजरेकर, युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव योगेश्वर कुर्ले, लक्ष्मीकांत परुळेकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.










