भंडारी हायस्कूलमध्ये ३० वर्षांच्या ग्रंथसेवेची दखल; पुण्यात आमदार प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते गौरव
मालवण (प्रतिनिधी) : शिक्षण क्षेत्रात तीन दशकांपासून ग्रंथपाल म्हणून ज्ञानसेवेचे व्रत जपणारे मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रफुल्ल वसंत देसाई यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे आयोजित सोहळ्यात पदवीधर मतदारसंघाचे आमदार प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
सी.एफ.टी.यु.आय. संलग्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्याक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील विविध भागांतील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना यावेळी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. भंडारी हायस्कूलमध्ये गेली ३० वर्षे ग्रंथपाल म्हणून कार्यरत असलेल्या प्रफुल्ल देसाई यांच्या ग्रंथसेवा आणि शैक्षणिक योगदानाची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजवणे, ज्ञानसंपदेचे जतन करणे आणि शैक्षणिक प्रक्रियेला पूरक सेवा देणे, अशा महत्त्वपूर्ण कार्यात ग्रंथपालाची भूमिका असते. तीन दशकांच्या सेवाकाळात प्रफुल्ल देसाई यांनी बजावलेल्या या ज्ञानसेवेचा राज्यस्तरावर सन्मान झाल्याने मालवणच्या शैक्षणिक क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रतापसिंह पाटील, राज्याच्या महिला कल्याण आयुक्त सुनीता ओव्हाळ, एच.डब्ल्यू.पी.एल. मुंबईच्या नियती गांधी, बार्टीच्या सुचेता शिंदे, अगस्तीन फर्नांडिस, गायक पंडित राजगुरू, शितल जानराव, शिक्षकेतर विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश रोकडे, प्रदेश सचिव चंद्रशेखर सावंत, राज्य समन्वयक व खजिनदार संजय बनसोडे, राज्य संघटक सतीश साठे आणि अशोक मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार प्रतापसिंह पाटील यांनी ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्थेसमोरील अडचणी, शिक्षकांच्या पेन्शनचा प्रश्न आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्याक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना या प्रश्नांसाठी करीत असलेले कार्य महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार म्हणून शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे मांडून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी सोमनाथ शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
तीन दशकांच्या ग्रंथसेवेची राज्यस्तरावर दखल घेत प्रफुल्ल देसाई यांना मिळालेला हा सन्मान मालवणच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी गौरवास्पद ठरला आहे.












