२८ नोव्हेंबरला विशेष सत्कार; साहित्य, पत्रकारिता, नाट्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल | सहा आदर्श वाचकांचाही होणार सन्मान
मालवण (प्रतिनिधी) : साहित्य, कला, पत्रकारिता, नाट्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या मालवण परिसरातील १९ मान्यवर साहित्यिकांचा सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलनात विशेष सन्मान करण्यात येणार आहे. याशिवाय मालवणमधील तीन वाचनालयांच्या माध्यमातून निवड करण्यात आलेल्या सहा आदर्श वाचकांचाही गौरव होणार आहे. त्यामुळे या संमेलनाच्या निमित्ताने मालवणच्या साहित्यिक आणि वाचनसंस्कृतीचा विशेष सन्मान अनुभवायला मिळणार आहे.
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण येथे २८ आणि २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या अनुदानातून हे संमेलन होत आहे. ‘माझा काळ, माझी भूमिका’ ही संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना असून ग्रंथदिंडी, स्थानिक कवी संमेलन, निमंत्रित कवी संमेलन, मुलाखती, विविध साहित्यिक स्पर्धा आणि वैचारिक कार्यक्रमांची मेजवानी साहित्यप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे.
या संमेलनात मालवण परिसरातील विविध क्षेत्रांतील १९ मान्यवरांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे. यामध्ये ज्येष्ठ मालवणी साहित्यिक अरविंद म्हापणकर यांच्यापासून ते पत्रकारिता आणि नाट्यविश्वात कार्यरत असलेल्या नव्या पिढीतील साहित्यिकांपर्यंत विविध क्षेत्रांतील व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे.
ज्येष्ठ साहित्यिक अरविंद म्हापणकर यांनी ‘गावगजाली’, ‘सरमिसळ’ या साहित्यसंग्रहांसह ‘केला तुका झाला माका’, ‘प्रतिकार’ आणि ‘प्रेम पहावं करून’ या नाटकांतून मालवणी भाषेची ताकद अधोरेखित केली आहे. वयाच्या ८४ व्या वर्षीही त्यांची लेखननिष्ठा कायम आहे. डॉ. विवेक रेडकर यांनी वैद्यकीय संशोधन आणि आरोग्यविषयक लेखनातून सामाजिक जनजागृती केली असून ‘आरोग्याचे पोस्टमार्टम’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे.
रवींद्र वराडकर यांनी ३२ वर्षांच्या अध्यापन सेवेसोबत ललित लेखन, व्यक्तिचित्रे, कथा, कविता आणि समीक्षा या साहित्यप्रकारांत योगदान दिले आहे. वैशाली पंडित यांचे चार दशकांहून अधिक काळातील साहित्यिक कार्य उल्लेखनीय असून त्यांचे कथासंग्रह, ललित लेखसंग्रह आणि चरित्रग्रंथ प्रकाशित झाले आहेत. ‘ऐलमा पैलमा अक्षरदेवा’ या उपक्रमाच्या माध्यमातूनही त्या साहित्यप्रसाराचे काम करतात. संध्या शिवराम तांबे या ‘कोकणच्या बहिणाबाई’ म्हणून परिचित असून त्यांच्या ‘पालवी फुटलेली स्वप्ने’ या काव्यसंग्रहातील कवितांचा समावेश मुंबई विद्यापीठाच्या एम.ए. अभ्यासक्रमात झाला आहे.
मालवणी, कोकणी, मराठी आणि हिंदी भाषांमध्ये साहित्यनिर्मिती करणारे रुजारिओ पास्कॉल पिंटो यांनी बहुभाषिक साहित्यविश्वात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या साहित्यकृतींचा समावेश गोवा शिक्षण मंडळ आणि मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात झाला आहे. निवृत्त शिक्षक विनायक प्रल्हाद कोळंबकर यांनी शैक्षणिक लेखनासोबत नाट्यपरीक्षण आणि दशावतारी लोककलेत योगदान दिले आहे. मेघना संजय जोशी या शिक्षिका, समुपदेशक आणि बालसाहित्य लेखिका म्हणून परिचित असून ‘अ’क्षरांच्या कविता’ आणि ‘गडबडगुंडा’ या पुस्तकांसह त्यांच्या बालसाहित्यविषयक लेखनाला विशेष लोकप्रियता मिळाली आहे.
पत्रकारिता आणि नाट्यक्षेत्रातील योगदानाबद्दल प्रफुल्ल देसाई यांचा गौरव होणार असून त्यांनी ‘रत्नागिरी टाइम्स’मध्ये पत्रकारिता केली आहे. मंदार श्रीकांत सांबारी हे कवी, गीतकार, संगीतकार, गायक आणि शीघ्रकवी म्हणून ओळखले जातात. कोकणच्या मातीशी नाते सांगणाऱ्या त्यांच्या गीतांना रसिकांची पसंती मिळाली आहे. कमलेश विनायक गोसावी यांनी कविता, कथा, शैक्षणिक लेखन, मालवणी नाट्यगीतलेखन आणि कातळशिल्प अभ्यासाच्या माध्यमातून योगदान दिले आहे.
शुभदा (तनुश्री) राजेश पेडणेकर यांचा ‘शब्दगंध’ हा साहित्यसंग्रह प्रसिद्ध असून बालसाहित्य, कविता आणि खाद्यसंस्कृतीविषयक लेखनातून त्या वाचकांशी जोडल्या गेल्या आहेत. उमेश दिनकर कोदे यांनी ‘गाथा कांदळगावची, महती रामेश्वराची’ या पुस्तकातून कांदळगावचा इतिहास, संस्कृती आणि परंपरांचे दस्तऐवजीकरण केले आहे. पत्रकार, संपादक आणि लेखक सुयोग श्रीनिवास पंडित यांची ‘सुक्या सुंगटाची कढी’ ही मालवणी कादंबरी प्रसिद्ध आहे.
मालवणी रंगभूमीवर आपल्या नाटकांनी वेगळी ओळख निर्माण करणारे संदीप दत्ताराम चिपकर यांचाही सन्मान होणार आहे. ‘शेजारी पडलो आजारी’, ‘बनवाबनवी’, ‘टॉस का बॉस’, ‘इस्काटलेली जिंदगी’ आणि ‘दे दणका’ ही त्यांची नाटके लोकप्रिय आहेत. शिक्षण, साहित्य आणि बालनाट्य क्षेत्रातील चार दशकांहून अधिक योगदानाबद्दल सुरेश ठाकूर यांचा गौरव केला जाणार आहे. ‘शतदा प्रेम करावे’ आणि ‘शब्दांच्या पलीकडले’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
दूरचित्रवाणी पत्रकारिता आणि वृत्तनिवेदन क्षेत्रातील योगदानाबद्दल ऋषी देसाई यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. झी २४ तास, टीव्ही ९ मराठी, लोकशाही मराठी आणि पुढारी न्यूज अशा माध्यमांतून त्यांनी काम केले आहे. ‘नाटक मंडळी’ या ऑनलाइन मालिकेच्या माध्यमातून नाट्यविश्वातील व्यक्तिमत्त्वे आणि घडामोडी प्रेक्षकांसमोर आणण्याचे काम त्यांनी केले आहे.
मालवणी साप्ताहिक ‘जनयुग’चे संपादक राजेंद्र खांडाळेकर यांनी संपादकीय लेखन आणि प्रकाशनाची परंपरा पुढे सुरू ठेवली आहे. तर ४ ऑक्टोबर १९४७ पासून सुरू असलेल्या ‘आघाडी’ या साप्ताहिकाचे संपादक आणि प्रकाशक नंदकिशोर महाजन यांनी साप्ताहिकाची दिवाळी अंकाची परंपरा जपत नवोदित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
सहा आदर्श वाचकांचाही होणार गौरव
साहित्यिकांचा सन्मान करण्याबरोबरच वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मालवणमधील तीन वाचनालयांच्या माध्यमातून आदर्श बाल वाचक आणि आदर्श मोठा वाचक यांची निवड करण्यात आली आहे.
यामध्ये शिवाजी वाचन मंदिराच्या वतीने बाल वाचक म्हणून कुमार हिमांशू संतोष मालवणकर आणि मोठ्या गटातून श्री. अनंत महादेव अंधारी यांचा गौरव होणार आहे.
नगर वाचन मंदिराच्या वतीने बाल गटातून कु. अस्मि अशोक आठल्येकर आणि मोठ्या गटातून श्री. प्रफुल कमलाकर गवंडे यांची निवड करण्यात आली आहे.
तर बॅरिस्टर नाथ पै सेवांगण संचलित साने गुरुजी वाचन मंदिराच्या वतीने बाल गटातून सोहम धामापूरकर आणि मोठ्या गटातून श्री. चंद्रप्रकाश पिंगुळकर यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
साहित्यिकांच्या सर्जनशील योगदानाचा गौरव आणि वाचनाची आवड जोपासणाऱ्या वाचकांचा सन्मान अशा दुहेरी उपक्रमातून हे संमेलन मालवणच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख करून देणार आहे. ज्येष्ठ साहित्यिकांच्या अनुभवांचा वारसा आणि नव्या पिढीतील लेखकांच्या अभिव्यक्तीला एकाच व्यासपीठावर आणण्याबरोबरच वाचनसंस्कृतीची नवी पिढी घडविण्याच्या दृष्टीनेही हे संमेलन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.











