छत्रपती शिवरायांचा पराक्रम, संतपरंपरा आणि मुंबईची गौरवगाथा आता लेझर शोमधून अनुभवता येणार; दररोज ३० लाख लिटर पाण्याचे एरेशन
मुंबई : पवई तलावाच्या सौंदर्यात आता आधुनिक तंत्रज्ञानाची भर पडली आहे. तलावाच्या गणेश घाटावर उभारण्यात आलेला अत्याधुनिक ‘लाईट, साउंड आणि म्युझिकल फाउंटन शो’ मुंबईकरांसह पर्यटकांसाठी नवे आकर्षण ठरणार आहे. मराठ्यांचा देदीप्यमान इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, महाराष्ट्राची समृद्ध संतपरंपरा, संस्कृती आणि मुंबईची गौरवशाली गाथा यांचा अनुभव आता प्रकाश, संगीत आणि दृक्श्राव्य माध्यमातून घेता येणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईच्या पर्यटनाला नवी ओळख मिळेल, असा विश्वास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला.
पवई तलाव येथील गणेश घाटावर उभारण्यात आलेल्या या ‘लाईट, साउंड आणि म्युझिकल फाउंटन शो’चे उद्घाटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, म्हाडाच्या स्लम बोर्डाचे मुख्य अधिकारी सतीश भारतीय यांच्यासह म्हाडा आणि मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
या प्रकल्पांतर्गत जागतिक दर्जाचा मल्टिमीडिया लाईट अँड साउंड शो साकारण्यात आला आहे. संगीतमय कारंजे, वॉटर स्क्रीन आणि फायर जेट्स यांसारख्या अत्याधुनिक सुविधांचा यामध्ये समावेश आहे. विशेष दृश्य परिणामांच्या माध्यमातून तीन वेगवेगळे चित्रपट सादर केले जाणार आहेत. या माध्यमातून महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक परंपरा आणि मुंबईच्या जडणघडणीचा प्रवास प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. त्यामुळे मनोरंजनासोबतच इतिहास आणि संस्कृतीची माहिती देणारा हा शो पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरण्याची अपेक्षा आहे.
या प्रकल्पाचे वैशिष्ट्य केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नाही. पवई तलावाच्या पर्यावरणीय दृष्टीनेही या फाउंटनची महत्त्वाची भूमिका असणार आहे. फाउंटनमधील एरेशन अर्थात पाण्यात हवामिश्रण करण्याच्या प्रक्रियेमुळे दररोज सुमारे ३० लाख लिटर पाण्यात हवा मिसळण्यास मदत होणार आहे. परिणामी, पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास हातभार लागू शकतो. याशिवाय पाण्याच्या बाष्पीभवनामुळे परिसरात नैसर्गिक थंडावा निर्माण होऊन स्थानिक तापमान कमी होण्यासही मदत होण्याची अपेक्षा आहे.
पवई तलावाच्या सौंदर्यात भर घालतानाच त्याच्या स्वच्छतेवरही विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पर्यटनविकासासोबतच तलावाचे पर्यावरण आणि जलसंपत्तीचे संवर्धन करण्याच्या दृष्टीनेही या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे.
आधुनिक तंत्रज्ञान, ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक वैभव आणि पर्यावरण संवर्धन यांचा संगम असलेला हा म्युझिकल फाउंटन मुंबईच्या पर्यटन नकाशावर पवई तलावाला नवी ओळख मिळवून देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.










