मालवण : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अनुदानित, बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलन – २०२६ च्या निमित्ताने शनिवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ५.३० या वेळेत खुले स्थानिक कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलनाच्या माध्यमातून मालवण व परिसरातील नवोदित तसेच प्रस्थापित कवी आणि कवयित्रींना आपल्या स्वरचित कवितांचे सादरीकरण करण्यासाठी हक्काचे साहित्यिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्थानिक साहित्यिक प्रतिभेला प्रोत्साहन देणे, काव्यलेखनाची आवड जोपासणे आणि स्थानिक कवींच्या साहित्यिक अभिव्यक्तीला व्यासपीठ मिळवून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. मालवणच्या साहित्यविश्वातील विविध प्रवाह आणि नव्या लेखनप्रतिभेचा परिचय या कवी संमेलनाच्या माध्यमातून होणार आहे.
तरी मालवण व परिसरातील सर्व नवोदित आणि प्रस्थापित कवी-कवयित्रींनी या खुले कवी संमेलनात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या स्वरचित कवितांचे सादरीकरण करावे, असे आवाहन सेवांगणच्या वतीने करण्यात आले आहे.
नाव नोंदणी : इच्छुक कवी-कवयित्रींनी आपली कविता आणि आपला संक्षिप्त परिचय ऋतुजा केळकर यांच्या व्हॉट्सॲप क्रमांक ९४२०४ २३७९० वर पाठवून नाव नोंदणी करावी.
हे कवी संमेलन बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, धुरीवाडा, चिवला बीच, मालवण येथे होणार आहे. या साहित्यिक उपक्रमात स्थानिक कवी-कवयित्रींनी सहभागी व्हावे, असे आवाहन सेवांगणचे अध्यक्ष डॉ. देवदत्त परुळेकर यांनी केले आहे.











