आचरा ग्रामपंचायतीचे एसटी महामंडळाला पत्र; मच्छी विक्रेत्या महिलांची मागणी
मालवण (प्रतिनिधी) : आचरा बंदरातून कणकवली येथे मच्छी विक्रीसाठी जाणाऱ्या महिलांना एसटी बसमधून मच्छी वाहून नेण्यात अडचणी येत असल्याने त्यांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. या महिलांच्या समस्येची दखल घेत आचरा ग्रामपंचायतीने एसटी महामंडळाच्या कणकवली विभाग नियंत्रकांना लेखी निवेदन दिले आहे. एसटी बसमधून मच्छी वाहतुकीस आवश्यक अटी व शर्तींसह परवानगी द्यावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.
आचरा बंदर परिसरातील अनेक महिला मच्छी विक्रीच्या व्यवसायावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आचरा येथून कणकवली येथे मच्छी विक्रीसाठी नेण्यासाठी योग्य वाहतूक सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना अडवणूक आणि त्रास सहन करावा लागत आहे. एसटीच्या प्रवासी बसमधून मच्छी वाहतुकीस आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे महिलांना मच्छी बाजारपेठेत घेऊन जाणे कठीण होत असून, त्याचा परिणाम त्यांच्या दैनंदिन व्यवसायावर होत आहे. परिणामी त्यांना आर्थिक नुकसानही सहन करावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मच्छी विक्रेत्या महिलांची ही अडचण लक्षात घेऊन एसटी महामंडळाने प्रवासी बसमधून मच्छी वाहतुकीस परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मच्छी वाहतुकीसाठी आवश्यक त्या अटी व शर्ती निश्चित कराव्यात. तसेच वाहतुकीदरम्यान प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही, स्वच्छता राखली जाईल आणि मच्छी सुरक्षितपणे वाहून नेता येईल, यासाठी योग्य व्यवस्था करावी, अशी विनंती ग्रामपंचायतीने केली आहे.
सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर यांच्यासह मच्छी विक्रेत्या विशाखा खवणेकर, छाया पराडकर, मनस्वी तोडणकर, गौरी सारंग, दीक्षा जोशी, सुवर्णा पराडकर, विमल बापर्डेकर, सुचिता तोडणकर, मीनल धुरी आणि माधुरी सारंग उपस्थित होत्या.
मच्छी विक्रेत्या महिलांच्या उपजीविकेचा प्रश्न लक्षात घेऊन एसटी महामंडळाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.










