कार्तिकी सुर्वे प्रथम; वेदा खोरजे द्वितीय, अवनी परब तृतीय
मालवण (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमध्ये जागतिक शांततेचे महत्त्व, बंधुभाव, सहिष्णुता आणि सामाजिक सलोखा या मूल्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने लायन्स क्लब मालवणतर्फे मालवण येथील कन्याशाळेत ‘जागतिक शांतता’ या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत कार्तिकी सदानंद सुर्वे हिने प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेत वेदा विठ्ठल खोरजे हिने द्वितीय, तर अवनी सुजित परब हिने तृतीय क्रमांक मिळविला. दोन विद्यार्थिनींना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत शाळेतील एकूण ११ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी निबंधाच्या माध्यमातून जागतिक शांततेविषयी आपले विचार मांडले. युद्ध, संघर्ष आणि असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर शांतता, परस्पर सहकार्य आणि वैश्विक बंधुभाव यांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
या वेळी प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक श्रद्धा गोसावी, शिवानी पाटकर, आकांक्षा कसले, प्रियांका वराडकर आणि प्रतीक्षा जाधव उपस्थित होते. तसेच लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, सेक्रेटरी पूनम चव्हाण, खजिनदार राधिका मोंडकर, गणेश प्रभुलकर, मुकेश बावकर, महेश अंधारी, रुजरीओ पिंटो, वैशाली शंकरदास आणि उमेश शिरोडकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये शांतता, सहिष्णुता आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव रुजविण्यासाठी लायन्स क्लब मालवणतर्फे राबविण्यात आलेला हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.











