बोट मास्टर सुशांत राणे आणि महेंद्र येरागी यांचा पुढाकार; युथ बिट्स फॉर क्लायमेट, कांदळवन विभाग आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे सहकार्य
मालवण (प्रतिनिधी) : निवती लाईटहाऊस परिसरातील समुद्रात जखमी अवस्थेत सापडलेल्या दुर्मीळ भासणाऱ्या ‘ग्रेटर क्रेस्टेड टर्न’ या समुद्री पक्ष्याला वेळीच मदत मिळाल्याने जीवदान मिळाले आहे. देवबाग येथील बोट मास्टर सुशांत राणे आणि महेंद्र येरागी यांनी प्रसंगावधान राखत या पक्ष्याची समुद्रातून सुटका केली. युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्था, कांदळवन विभाग आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने पक्ष्यावर उपचार करण्यात आले असून, सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली.
निवती लाईटहाऊस परिसरात पर्यटकांना समुद्रसफर घडवून आणत असताना सुशांत राणे आणि महेंद्र येरागी यांना एक समुद्री पक्षी जखमी अवस्थेत समुद्राच्या पाण्यात पडलेला दिसला. त्यांनी तत्काळ त्याला सुरक्षितपणे बाहेर काढून देवबाग किनाऱ्यावर आणले. त्यानंतर त्यांनी युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेशी संपर्क साधून पक्ष्याच्या बचावासाठी मदत मागितली.
संस्थेने या घटनेची माहिती कांदळवन विभागाला दिली. मालवणचे वनपाल सत्यवान सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली राणे आणि येरागी यांनी जखमी पक्षी कांदळवन विभागाच्या कार्यालयात सुपूर्द केला. मालवणचे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर कानसे यांनी पक्ष्यावर उपचार केले. उपचारांनंतर पक्ष्याची प्रकृती स्थिरावल्याचे त्यांनी सांगितले.
पिवळी चोच, काळा तुरा; ‘ग्रेटर क्रेस्टेड टर्न’चे वैशिष्ट्य
‘ग्रेटर क्रेस्टेड टर्न’ हा किनारपट्टी आणि समुद्र परिसरात आढळणारा मोठ्या आकाराचा समुद्री पक्षी आहे. त्याची पिवळी चोच, डोक्यावरील काळा तुरा आणि राखाडी-पांढऱ्या रंगछटांतील शरीर ही त्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. त्याचे पंख लांब व निमुळते असून, दुभंगलेली शेपटी आणि हवेत सहजतेने झेपावण्याची शैली यामुळे तो लक्षवेधी ठरतो.
हा पक्षी सामान्यतः थव्यांमध्ये आढळतो. किनाऱ्यापासून दूर असलेल्या लहान बेटांवर तो वसाहती करून प्रजनन करतो. खडक, वाळूची बेटे आणि तरंगत्या आधारांवर इतर टर्न व गल पक्ष्यांसोबत तो विश्रांती घेतो, अशी माहिती युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेने दिली.
वन्यजीव संवर्धनासाठी समन्वयाचे उदाहरण
समुद्रात जखमी अवस्थेत आढळलेल्या पक्ष्याला तातडीने मदत करून त्याच्यावर उपचार होण्यासाठी विविध घटकांनी केलेला समन्वय महत्त्वाचा ठरला. पर्यटन व्यवसायाशी संबंधित व्यक्तींनी दाखवलेली तत्परता, स्वयंसेवी संस्थेचा पुढाकार, कांदळवन विभागाचे मार्गदर्शन आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेले उपचार यामुळे या समुद्री पक्ष्याचे प्राण वाचवता आले. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी नागरिकांनीही संवेदनशीलता आणि जबाबदारी दाखवण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली.










