वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या सांस्कृतिक योगदानाचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याकडून कौतुक; शहरात नाट्यगृह उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही
कणकवली, दि. २१ (प्रतिनिधी) : कणकवली शहराला समृद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला असून, हा वारसा जपण्याचे महत्त्वपूर्ण काम वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान गेल्या चार दशकांपासून करीत आहे. एकांकिका, नाट्यस्पर्धा आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून प्रतिष्ठानने अनेक कलाकार घडविले असून, नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. प्रतिष्ठानच्या प्रत्येक उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.
वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यसंकुलात आयोजित ‘त्रिसूत्री संगीत महोत्सवा’चे उद्घाटन नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील, पं. समीर दुबळे, आरती ठाकुर-कुंडलकर, सुयोग कुंडलकर, चारुदत्त फडके, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ॲड. एन. आर. देसाई, डॉ. समीर नवरे, दामोदर खानोलकर, सीमा कोरगावकर, लीना काळसेकर, मनोज मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.
वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या चार दशकांच्या प्रवासाचा उल्लेख करताना संदेश पारकर म्हणाले की, उदय पंडित, कै. सुबोध टिकले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुमारे ४० वर्षांपूर्वी प्रतिष्ठानचे रोपटे लावले. आज त्याचे रूपांतर वटवृक्षात झाले आहे. या काळात प्रतिष्ठानने अनेक कलाकार घडविले असून, सिंधुदुर्गासह महाराष्ट्रातील नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे.
आपल्या नगराध्यक्षपदाच्या पहिल्या कारकीर्दीत नगरपंचायतीच्या माध्यमातून प्रतिष्ठानला मदत सुरू केली आणि ती आजही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कणकवली शहराला क्रीडांगण, नाट्यगृह आणि व्यापारी संकुलाची गरज आहे. शहरात नाट्यगृह उभारण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून, या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही पारकर यांनी स्पष्ट केले. कोणत्याही सांस्कृतिक उपक्रमाच्या यशस्वितेसाठी लोकाश्रय आणि राजाश्रय या दोन्हींची आवश्यकता असते. वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान हे काम प्रभावीपणे करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पंडित वामनदाजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर एन. आर. देसाई, दामोदर खानोलकर आणि डॉ. समीर नवरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. परीक्षक आरती ठाकुर-कुंडलकर, सुयोग कुंडलकर आणि चारुदत्त फडके यांचे स्वागत सीमा कोरगावकर व लीना काळसेकर यांनी केले.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते ‘वामनदाजी शास्त्रोक्त गायन स्पर्धे’चा शुभारंभ करण्यात आला. स्पर्धेतील पहिल्या स्पर्धकाने जोधपुरी रागाचे सादरीकरण करून उपस्थित रसिकांची मने जिंकली. शास्त्रीय संगीताच्या सुरेल वातावरणात सुरू झालेल्या या महोत्सवाला रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नीलेश कोदे यांनी केले.










