मालवणमध्ये नायब तहसीलदार आणि तहसीलदार म्हणून बजावली होती सेवा; वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहरातील मेढा येथील मूळ रहिवासी आणि सध्या सिंधुदुर्गनगरी येथे वास्तव्यास असलेले सेवानिवृत्त तहसीलदार दत्तात्रय उर्फ बाबुराव व्यंकटेश कांदळगावकर (वय ८१) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने महसूल प्रशासनातील अनुभवी अधिकारी हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
दत्तात्रय कांदळगावकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तहसील कार्यालयांमध्ये सेवा बजावली होती. मालवण येथे त्यांनी अनेक वर्षे नायब तहसीलदार तसेच तहसीलदार म्हणून काम पाहिले. महसूल प्रशासनातील त्यांच्या प्रदीर्घ सेवेमुळे त्यांचा जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजाशी जवळचा संबंध होता.
शनिवारी सकाळी सिंधुदुर्गनगरी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रशासन, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.











