आमदार नीलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन; दीड किलोमीटर लांबीचा धूपप्रतिबंधक बंधारा उभारणार
सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट; तळाशील-सर्जेकोट-रेवंडी पुलाच्या प्रस्तावासाठीही सकारात्मक आश्वासन
मालवण (प्रतिनिधी) : समुद्राच्या लाटांचा वाढता मारा आणि किनारपट्टीची वेगाने होणारी धूप यामुळे तोंडवळी-तळाशील परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा निर्माण झालेला प्रश्न आता मार्गी लागण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. या किनारपट्टीच्या संरक्षणासाठी सुमारे १५ कोटी रुपये खर्चाच्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीलेश नारायणराव राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत, तर शिवसेना जिल्हाप्रमुख देवदत्त ऊर्फ दत्ता सामंत यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
तोंडवळी-तळाशील किनारपट्टीवर सुमारे दीड किलोमीटर लांबीचा धूपप्रतिबंधक बंधारा उभारण्यात येणार आहे. सध्या १५ कोटी रुपयांच्या निधीतून हे काम हाती घेण्यात आले असून, येत्या सहा महिन्यांत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती आमदार नीलेश राणे यांनी दिली. याशिवाय उर्वरित दीड कोटी रुपयांच्या निधीतून बंधाऱ्याचे पुढील काम पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
समुद्राच्या लाटांमुळे किनारपट्टीची होणारी धूप रोखणे, किनाऱ्यालगतच्या वस्तीचे संभाव्य धोक्यापासून संरक्षण करणे आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सोडवणे, या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अनेक वर्षांपासून किनारपट्टीच्या धूपप्रतिबंधक उपाययोजनांची मागणी करणाऱ्या तोंडवळी-तळाशीलमधील ग्रामस्थांसाठी या कामाचा प्रारंभ दिलासादायक ठरणार आहे.
भूमिपूजनप्रसंगी बोलताना आमदार नीलेश राणे म्हणाले की, खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणची किनारपट्टी सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक विकासकामे सातत्याने हाती घेतली जात आहेत. ज्या जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला आहे, त्या जनतेचे प्रश्न मार्गी लावणे ही आमची जबाबदारी आहे. नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तोंडवळी-तळाशीलच्या किनारपट्टी संरक्षणाचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
तोंडवळी-तळाशील-सर्जेकोट परिसर जोडणाऱ्या पुलाची मागणी
या कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख देवदत्त ऊर्फ दत्ता सामंत यांनी तोंडवळी-तळाशील-सर्जेकोट परिसराला जोडणारा पूल उभारण्याची मागणी आमदार नीलेश राणे यांच्याकडे केली. हा पूल उभारल्यास मालवण ते तळाशील दरम्यानचे अंतर कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर या भागातील वाहतूक आणि दळणवळण अधिक सुलभ होऊन पर्यटनालाही मोठी चालना मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना आमदार राणे यांनी तळाशील-सर्जेकोट-रेवंडी परिसराला जोडणाऱ्या पुलाच्या प्रस्तावाबाबत अनुकूल भूमिका घेतली. प्रस्ताव मंजूर होण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्याबरोबरच सर्वेक्षण करून लवकरात लवकर काम सुरू करण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या भागातील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण लक्ष घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या भूमिपूजन सोहळ्याला शिवसेनेचे उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख देवदत्त ऊर्फ दत्ता सामंत, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, विनायक बाईत, सभापती पूनम चव्हाण, तोंडवळीचे सरपंच तोंडवळकर, जेरोन फर्नांडिस, गणेश तोंडवळकर, वर्षा सांबारी, महेश राणे, संतोष कोदे, किसन मांजरेकर, संजय केळुसकर, प्रफुल्ल प्रभू, जयहरी कोचरेकर, बबन शिंदे, संजय तारी, बाबू परुळेकर, संतोष मिराशी, चावलं मुजावर, बाबू कदम, उदय घाडी यांच्यासह अन्य मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.











