किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीतर्फे आयोजन; अतुल काळसेकर यांच्या हस्ते श्री मोरेश्वराचे पूजन
मालवण (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या सागरी सामर्थ्याची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गच्या पायाभरणीचा ३६२ वा वर्धापन दिन बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी वायरी-दांडी येथील ‘मोरयाचा धोंडा’ या ऐतिहासिक स्थळी साजरा करण्यात येणार आहे. किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती, मालवण यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मालवणच्या समुद्रात उभारण्यात आलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी वायरी-दांडी किनाऱ्यावरील एका पाषाणाची पूजा करून किल्ल्याचे भूमिपूजन केले होते. शुक्रवार, २५ नोव्हेंबर १६६४ रोजी या पाषाणावर श्री गणेशाची प्रतिमा कोरून पूजन करण्यात आल्याची ऐतिहासिक नोंद आहे. याच पाषाणाला ‘मोरयाचा धोंडा’ किंवा ‘मोऱ्याचा धोंडा’ म्हणून ओळखले जाते. या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी येथे वर्धापन दिन साजरा केला जातो.
मोरयाचा धोंडा अर्थात श्री मोरेश्वर देवस्थानाला गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती गेली अनेक वर्षे प्रयत्नशील आहे. या ऐतिहासिक स्थळाचे महत्त्व अधोरेखित व्हावे आणि वर्धापन दिनाला शासकीय स्तरावरही मान्यता मिळावी, यासाठी समितीने सातत्याने पाठपुरावा केला आहे. तत्कालीन कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या प्रयत्नांतून या दिवशी जिल्हाधिकारी अथवा अपर जिल्हाधिकारी यांनी उपस्थित राहून शासकीय पूजा करावी, असे आदेशपत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले होते. या आदेशाचा संदर्भ क्र. आक्रो/स्वीस/किल्ले/२७/२०१७ असा आहे.
यंदा बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या हस्ते श्री मोरेश्वराचे पूजन होणार आहे. या ऐतिहासिक व धार्मिक सोहळ्याला शिवप्रेमी, इतिहासप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.












