मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती; सांस्कृतिक सादरीकरणातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात
कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, स्वराज्याचा गौरवशाली इतिहास आणि मराठी संस्कृतीचे वैभव यांचा भव्य आविष्कार घडविणारा ‘स्वराज्याचा सागरध्वज’ हा सांस्कृतिक सोहळा बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पायाभरणी दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना या माध्यमातून सांस्कृतिक मानवंदना अर्पण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन इतिहासाचा केवळ कथनातून नव्हे, तर संगीत, गायन, निवेदन, ध्वनी संयोजन, प्रकाशयोजना आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून भव्य सांस्कृतिक आविष्कार सादर केला जाणार आहे. ऐतिहासिक घटनांचे नाट्यमय सादरीकरण आणि मराठी संस्कृतीच्या विविध कलाविष्कारांतून शिवरायांच्या पराक्रमाची गाथा उलगडणार आहे.
या कार्यक्रमाचे संहितालेखन अंबर हडप यांनी केले असून, मंदार खर्डे निवेदनाची जबाबदारी सांभाळणार आहेत. कमलेश भडककर यांचे संगीत संयोजन हे कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. केतकी भावे जोशी, स्वरा जोशी, नचिकेत देसाई, जितेंद्र तुपे, विद्या करलगिकर आणि नरेंद्र उमप हे कलाकार आपल्या गायनातून या सोहळ्याला रंगत आणणार आहेत.
या भव्य सांस्कृतिक उपक्रमाचे संकल्पनाकार आमदार प्रमोद जठार असून, संयोजक म्हणून सुहास आदिकरकर काम पाहत आहेत. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर हे विनीत म्हणून कार्यक्रमाची जबाबदारी सांभाळत आहेत.
सांस्कृतिक सोहळ्याला सामाजिक बांधिलकीची जोड
या कार्यक्रमाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सांस्कृतिक सादरीकरणासोबतच दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्याचा सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यविचारांचे स्मरण, मराठी संस्कृतीचा गौरव आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांप्रती सामाजिक बांधिलकी अशा तीन महत्त्वाच्या भावनांचा संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळणार आहे.
बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक सोहळ्याला नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.











