सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक समितीचे अशासकीय प्रतिनिधी म्हणून निवड
मालवण (प्रतिनिधी) : तळगाव हितवर्धक संघ, मुंबई संचालित श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक तथा विद्यमान शालेय समितीचे सल्लागार प्रदीप शिंदे यांची सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक सुरक्षा परिषदेवर अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक समितीच्या प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड झाली आहे.
प्रदीप शिंदे यांनी आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक कारकिर्दीत अध्यापन आणि विद्यार्थी घडविण्याच्या कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये योगदान दिले आहे. मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासावर आणि सामाजिक मूल्यांच्या जडणघडणीवर विशेष भर दिला.
शैक्षणिक सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी सामाजिक कार्यातील सक्रियता कायम ठेवली आहे. श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या शालेय समितीचे सल्लागार म्हणून ते सध्या मार्गदर्शन करीत आहेत. शिक्षण क्षेत्रातील अनुभव, सामाजिक प्रश्नांची जाण आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करण्याची तळमळ ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये मानली जातात.
जिल्हा ग्राहक सुरक्षा परिषदेवरील नियुक्तीमुळे त्यांना ग्राहकांचे हक्क, ग्राहक संरक्षण, तसेच ग्राहकांच्या तक्रारी आणि समस्यांच्या निवारणासाठी काम करण्याची संधी मिळणार आहे. ग्राहकांची फसवणूक, अन्यायकारक व्यापार पद्धती आणि ग्राहक हक्कांशी संबंधित प्रश्न सक्षमपणे संबंधित यंत्रणांसमोर मांडण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.
शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनुभवाचा उपयोग ग्राहकहिताच्या कार्यासाठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतून अभिनंदन करण्यात येत आहे.











