सहा महिन्यांत किनारपट्टीचे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश; कोणालाही दोषी ठरवलेले नाही किंवा बांधकामांवर थेट कारवाईचे आदेश नाहीत, राणेंचे स्पष्टीकरण
मालवण (प्रतिनिधी) : राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे खंडपीठाने १७ नोव्हेंबर २०२६ रोजी दिलेला निर्णय मालवणच्या किनारपट्टीवरील पारंपरिक रहिवासी, मच्छीमार समाज आणि स्थानिक व्यावसायिकांच्या दृष्टीने दिलासादायक असल्याचा दावा आमदार निलेश राणे यांनी केला आहे. या आदेशात कोणालाही दोषी ठरवण्यात आलेले नाही, कोणताही दंड आकारण्यात आलेला नाही किंवा किनारपट्टीवरील बांधकामांवर थेट कारवाई करण्याचे निर्देश दिलेले नाहीत. प्रशासनाने पुढील सहा महिन्यांत सर्वेक्षण पूर्ण करून अनधिकृत बाबी आढळल्यास त्यांचा तपशील सादर करावा, असे निर्देश असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
मालवण येथील ‘नीलरत्न’ बंगल्यावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगरसेवक रविकिरण तोरसकर, बाबा परब, माजी नगरसेवक जॉन नरोन्हा, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहरप्रमुख राजू बिडये आदी उपस्थित होते.
आमदार राणे यांनी सांगितले की, किनारपट्टीच्या सर्वेक्षणासंदर्भात याचिकाकर्ते श्री. हुले यांनी २०१९ ते २०२५ या कालावधीत सातत्याने तक्रारी आणि याचिका दाखल केल्या होत्या. २०१९, २०२३, २०२४ आणि २०२५ मध्ये या विषयावर विविध नोटिसा व तक्रारी करण्यात आल्या. या प्रक्रियेदरम्यान ७ मार्च २०२४ रोजी मालवण नगरपरिषद, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड, भूमी अभिलेख विभाग, तलाठी कार्यालय आणि महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (एमसीझेडएमए) यांसह प्रशासनातील आठ ते दहा विभागांनी किनारपट्टीचे सर्वेक्षण करून त्यासंदर्भातील माहिती हरित लवादासमोर सादर केली होती.
या सर्वेक्षणातील बाबींचा वेळीच अभ्यास करून संबंधित अडचणी सोडवण्याची संधी होती. मात्र, तत्कालीन लोकप्रतिनिधींनी हा विषय योग्य पद्धतीने हाताळला नाही, अशी टीकाही राणे यांनी केली. सर्वेक्षणातील निष्कर्ष आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न त्याच वेळी गांभीर्याने घेतले असते, तर पुढील अडचणी टाळता आल्या असत्या, असे त्यांचे म्हणणे होते.
‘थेट कारवाईचा आदेश नाही, सहा महिन्यांत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश’
१७ नोव्हेंबर रोजीच्या आदेशाबाबत बोलताना राणे म्हणाले की, लवादाने प्रशासन, स्थानिक नागरिक किंवा कोणत्याही संस्थेला दोषी ठरवलेले नाही. कोणत्याही बांधकामावर दंड आकारण्याचा किंवा थेट कारवाई करण्याचा आदेश दिलेला नाही. पुढील सहा महिन्यांत प्रशासन आणि मालवण नगरपरिषदेने सर्वेक्षण पूर्ण करून अनधिकृत बाबी आढळल्यास त्यांचा तपशील सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून किनारपट्टीवरील रहिवाशांमध्ये भीती निर्माण करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
पारंपरिक रहिवासी आणि मच्छीमारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार
किनारपट्टीवर पिढ्यान्पिढ्या पारंपरिक पद्धतीने राहणाऱ्या नागरिकांना तसेच मच्छीमार बांधवांना कोणताही त्रास होऊ नये, ही आमची भूमिका असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. पारंपरिक निवासस्थानांबाबत किंवा पारंपरिक व्यवसायांबाबत प्रशासनाकडून चुकीची अथवा घाईघाईने कारवाई झाल्यास ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
“किनारपट्टीवर पारंपरिक पद्धतीने सुरू असलेल्या व्यवसायांना आणि रहिवाशांच्या हक्कांना धक्का लावण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही मच्छीमार समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. अशा प्रकारे अन्यायकारक कार्यवाही झाली, तर आम्हीच प्रशासनाच्या विरोधात उभे राहू,” असे राणे म्हणाले. जिल्हा प्रशासन, मालवण नगरपरिषद आणि एमसीझेडएमएच्या अधिकाऱ्यांना याबाबत स्पष्ट भूमिका कळवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
पर्यावरणाचे संरक्षण आणि स्थानिकांचे हक्क यांचा समतोल आवश्यक
किनारपट्टीचा प्रश्न सोडवताना पर्यावरणाचे संरक्षण आणि स्थानिक नागरिकांचे पारंपरिक हक्क या दोन्ही बाबींचा समतोल राखणे आवश्यक असल्याचे राणे यांनी नमूद केले. पर्यावरणाची हानी होऊ नये आणि स्थानिकांवरही अन्याय होऊ नये, हीच भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे असलेल्या नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. येत्या तीन ते चार महिन्यांत सर्वेक्षणातील बाबींवर प्रशासनासोबत चर्चा करण्यात येईल. त्यानंतर सहा महिन्यांच्या कालमर्यादेत लवादासमोर सकारात्मक सादरीकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
या प्रक्रियेत पालकमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार, नगरपरिषद तसेच नगरसेवक रविकिरण तोरसकर आणि इतर सहकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचेही राणे यांनी नमूद केले.
‘श्रेयवाद नको, किनारपट्टीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा’
या विषयावर कोणत्याही प्रकारच्या श्रेयवादात पडण्याची आपली इच्छा नसल्याचे सांगत राणे म्हणाले की, मालवणच्या किनारपट्टीचा गंभीर प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणे अधिक महत्त्वाचे आहे. कोण काय काम करत आहे, हे सोशल मीडियाच्या काळात जनतेला दिसत आहे. त्यामुळे कामाचे श्रेय घेण्यापेक्षा प्रत्यक्ष प्रश्न सोडवण्यावर भर दिला पाहिजे.
प्रशासनाने प्रत्येक वेळी न्यायालयीन प्रक्रियेवर जबाबदारी ढकलण्याऐवजी किनारपट्टीचे संरक्षण आणि स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहनही आमदार निलेश राणे यांनी केले.
दरम्यान, हरित लवादाच्या आदेशानंतर पुढील सहा महिन्यांत प्रशासनाकडून होणारे सर्वेक्षण आणि त्यातून समोर येणाऱ्या बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत. पारंपरिक रहिवासी, मच्छीमारांचे व्यवसाय, किनारपट्टीवरील बांधकामे आणि पर्यावरण संरक्षण या सर्व मुद्द्यांवर प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे मालवणवासीयांचे लक्ष लागले आहे.










