वैद्यकीय महाविद्यालयासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय ओरोसमध्ये; पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० खाटांच्या रुग्णालयाच्या बांधकामाला आता प्रशासकीय स्तरावर गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामावर प्रभावी नियंत्रण, नियमित देखरेख आणि स्थानिक पातळीवर समन्वय राखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सिंधुदुर्गनगरी (ओरोस) येथे सुरू करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेल्या मागणी आणि पाठपुराव्याला यामुळे यश आले आहे.
सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० खाटांच्या रुग्णालयाच्या उभारणीसाठी पहिल्या टप्प्यात ४२७.५६ कोटी रुपयांच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या टप्प्यात एकूण १ लाख ८१ हजार १४९.७३ चौरस मीटर क्षेत्रफळाचे बांधकाम प्रस्तावित आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ८१ हजार २६३.३६ चौरस मीटर क्षेत्रफळाचे बांधकाम करण्यात येणार असून, त्यासाठी ६२५.९४ कोटी रुपयांचा अंदाजित खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे हा जिल्ह्यातील मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक ठरणार आहे.
या प्रकल्पाच्या वाढत्या कामकाजाच्या पार्श्वभूमीवर बांधकामाचे प्रशासकीय व्यवस्थापन, प्रत्यक्ष कामावर नियंत्रण आणि क्षेत्रीय स्तरावरील समन्वय अधिक प्रभावी करण्यासाठी स्वतंत्र कार्यालयाची आवश्यकता होती. त्यानुसार संबंधित उपविभागाचे कार्यालय ओरोस येथे स्थलांतरित करण्याची मागणी करण्यात आली होती. राज्य शासनाने त्याला अधिकृत मंजुरी दिली आहे.
शासनाच्या निर्णयानुसार, ‘उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग (वैद्यकीय महाविद्यालय), सिंधुदुर्गनगरी (ओरोस)’ या नावाने हे कार्यालय कार्यरत होणार आहे. कणकवली येथे सध्या या विभागाकडे असलेल्या मंजूर पदांसह कार्यालयाचे स्थलांतर करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे शासनावर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही, अशी अटही घालण्यात आली आहे.
यापूर्वी हे कार्यालय अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, रत्नागिरी यांच्या अंतर्गत कार्यरत होते. नव्या निर्णयानुसार ते अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, सिंधुदुर्ग यांच्या अधिपत्याखाली आणण्यात आले आहे. तसेच कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली यांच्या नियंत्रणाखाली या कार्यालयाचे कामकाज चालणार आहे.
नवीन कार्यालयासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, सिंधुदुर्ग यांना देण्यात आले आहेत. स्वतंत्र कार्यालयामुळे वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० खाटांच्या रुग्णालयाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील बांधकामावर स्थानिक पातळीवर नियमित देखरेख ठेवणे, कामातील अडचणींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय समन्वय साधणे अधिक सुलभ होणार आहे.
एकूण १,०५३.५० कोटी रुपयांच्या प्रस्तावित बांधकाम प्रकल्पासाठी स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा उपलब्ध होणार असल्याने सिंधुदुर्गच्या आरोग्य सुविधांच्या विस्ताराच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.











