वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली टाळांच्या गजरात निषेध; निधी पुन्हा मिळाला नाही तर भजनी कलाकारांचा भव्य मोर्चा काढण्याचा इशारा
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील ११२ भजन मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी मंजूर झालेला निधी अखर्चित राहिल्याने परत गेल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसमोर ‘भजन’ आंदोलन केले. माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी टाळांच्या गजरात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर भजन सादर करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
सत्ताधाऱ्यांनी मोठा गाजावाजा करत जिल्ह्यातील भजन मंडळांसाठी भजन साहित्य वाटपाची योजना जाहीर केली होती. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्ह्यातील शेकडो भजन मंडळांनी अर्ज केले होते. मात्र, जिल्हा परिषदेकडून मंजूर निधी खर्च न झाल्याने ११२ भजन मंडळांचा निधी परत गेला. परिणामी, योजनेसाठी अर्ज केलेली मंडळे भजन साहित्याच्या लाभापासून वंचित राहिली आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला.
भजन मंडळांसाठी जाहीर केलेली योजना प्रत्यक्षात आणण्यात जिल्हा परिषद प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करत वैभव नाईक यांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. भजन मंडळांना मंजूर झालेला निधी पुन्हा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. हा निधी पुन्हा मिळाला नाही, तर जिल्ह्यातील भजनी कलाकारांना सोबत घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या जान्हवी सावंत, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कणकवली तालुकाप्रमुख राजू राठोड, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, पंचायत समिती सदस्य तथा गटनेते योगेश धुरी, ओरोस विभागप्रमुख रवीबुवा कदम, कसाल शहरप्रमुख नंदू आंबेरकर, ओरोस शहरप्रमुख भगवान परब, कळसुली विभागप्रमुख बबली राणे, बंड्या कोरगावकर, गणेश मेस्त्री, बाळू पालव, रवी परब, मामा ओरोसकर, निलेश परब, अमित राणे, सदाशिव पालव आदी शिवसैनिक सहभागी झाले होते.










