नगर वाचन मंदिरातर्फे स्पर्धेचे आयोजन; शुभ्रा कांदळगावकर द्वितीय, आकांक्षा कासले तृतीय
मालवण (प्रतिनिधी) : नगर वाचन मंदिर, मालवण यांच्या वतीने आयोजित मालवण तालुकास्तरीय वाचक स्पर्धेत योगेश रवींद्र मुणगेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. शुभ्रा शांताराम कांदळगावकर यांनी द्वितीय, तर आकांक्षा शांताराम कासले यांनी तृतीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ पारितोषिकांमध्ये श्रेया शिवाजी गावडे यांनी प्रथम, तर भार्गवी राजन तळासकर यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.
नगर वाचन मंदिराच्या वाचन कक्षात ही स्पर्धा उत्साहात पार पडली. यावेळी स्पर्धेचे परीक्षक विनायक कोळंबकर आणि दर्श सामंत तसेच ग्रंथपाल संजय शिंदे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच श्री देवी सरस्वती आणि संविधान दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
ग्रंथपाल संजय शिंदे यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेचा उद्देश स्पष्ट केला. वाचन संस्कृतीचा प्रसार, वाचकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि विद्यार्थ्यांसह सर्व वयोगटांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, या दृष्टीने अशा स्पर्धांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
स्पर्धेतील सर्व यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके आणि प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना ८ डिसेंबर २०२६ रोजी रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत थेट सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.
सहायक ग्रंथपाल श्रेया चव्हाण यांनी आभार मानले. स्पर्धेला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रतिभा पेडणेकर आणि रमाकांत जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.











