भारतीय बौद्ध महासभा मालवणचा पुढाकार; वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवादी विचारांचा प्रसार करण्यावर भर
मालवण (प्रतिनिधी) : समाजात रुजलेल्या अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरा आणि गैरसमजुतींचे निर्मूलन करून नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकवादी विचारसरणी रुजविण्याच्या उद्देशाने भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवणच्या संस्कार विभागाच्या वतीने खोटले येथे अंधश्रद्धा निर्मूलन शिबिराचे आयोजन करण्यात आले. तथागत भगवान बुद्धांच्या प्रज्ञा, शील आणि करुणेच्या विचारांचा प्रसार करत अंधश्रद्धामुक्त समाजनिर्मितीचा संदेश या शिबिरातून देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या आणि आदर्श व्यक्तिमत्त्वांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून तसेच दीप व धूप प्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी सामूहिकरीत्या त्रिसरण पंचशील ग्रहण केले. खोटले गाव शाखेच्या वतीने वैभव कदम यांनी उपस्थित मान्यवर आणि उपासक-उपासिकांचे स्वागत केले. तालुका सरचिटणीस नचिकेत पवार यांनी प्रास्ताविक केले.
शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक केंद्रीय शिक्षक, माजी श्रामणेर तथा बौद्धाचार्य योगेश वराडकर यांनी प्रात्यक्षिकांसह अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनात अनेकदा नकळतपणे आपण अंधश्रद्धांना बळी पडतो. समाजात प्रचलित असलेल्या विविध अंधश्रद्धांचे स्वरूप, त्यामागील गैरसमजुती आणि त्यातून निर्माण होणारे मानसिक व सामाजिक परिणाम त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास न ठेवता तिची सत्यता तपासणे, निरीक्षण करणे आणि बुद्धीच्या कसोटीवर विचार करणे आवश्यक आहे, असे वराडकर यांनी सांगितले.
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्गचे सरचिटणीस, केंद्रीय शिक्षक, माजी श्रामणेर तथा बौद्धाचार्य संजय पेंडुरकर यांनीही मार्गदर्शन केले. अंधश्रद्धा ही केवळ वैयक्तिक समस्या नसून समाजाच्या प्रगतीतील मोठा अडथळा आहे. शिक्षण, जनजागृती आणि वैचारिक परिवर्तनाच्या माध्यमातूनच समाजाला अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर काढता येईल. त्यासाठी प्रत्येकाने विवेकवादी विचारसरणी स्वीकारणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवणचे अध्यक्ष रविकांत कदम यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. संस्कार विभागाचे उपाध्यक्ष सूर्यकांत कदम यांनी कार्तिक पौर्णिमा आणि तिचे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व याविषयी माहिती दिली.
यावेळी जिल्हा सरचिटणीस संजय पेंडुरकर, जिल्हा कोषाध्यक्ष शिवप्रसाद चौकेकर, जिल्हा संस्कार सचिव विलास वळंजु, जिल्हा महिला शाखा संस्कार उपाध्यक्ष स्नेहा पेंडुरकर, तालुकाध्यक्ष रविकांत कदम, तालुका सरचिटणीस नचिकेत पवार, संस्कार विभाग उपाध्यक्ष सूर्यकांत कदम, संस्कार विभाग सचिव मिलिंद पवार, माजी संरक्षण सचिव रमेश कदम, मसदे गाव शाखा अध्यक्ष तानाजी कदम, मालवण तालुका मुंबईचे संस्कार उपाध्यक्ष प्रथमेश वराडकर, वराड गाव शाखेचे उपाध्यक्ष अरविंद वराडकर, माजी श्रामणेर तथा बौद्धाचार्य व केंद्रीय शिक्षक शशिकांत कदम, खोटले गाव शाखेचे सचिव वैभव कदम, सिद्धार्थ कदम, मिलिंद कदम, सुनील कदम आणि दिलीप कदम आदी उपस्थित होते.
संस्कार विभागाचे उपाध्यक्ष सूर्यकांत कदम यांनी आभार मानले. शिबिराला उपासक-उपासिका तसेच बालक-बालिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.









