कुडाळ तालुकास्तरीय ५४ व्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन; विविध गटांत ७७ वैज्ञानिक प्रतिकृतींचा सहभाग
कुडाळ (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासोबतच त्यांच्या संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी विज्ञान प्रदर्शन महत्त्वाची भूमिका बजावते. विद्यार्थ्यांनी अशा प्रदर्शनातून प्रेरणा घेऊन संशोधक होण्याचे स्वप्न पाहावे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विज्ञान संशोधन केंद्र (सायन्स रिसर्च सेंटर) उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार निलेश राणे यांनी दिली.
कुडाळ पंचायत समिती, शिक्षण विभाग, तालुका विज्ञान मंडळ आणि लक्ष्मीनारायण विद्यालय, बिबवणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५४ व्या कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले. बिबवणे येथील लक्ष्मीनारायण विद्यालयात २६ आणि २७ नोव्हेंबर असे दोन दिवस हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात प्राथमिक गटातील ५०, माध्यमिक गटातील २२ आणि शिक्षक शैक्षणिक साधन गटातील ५ अशा एकूण ७७ वैज्ञानिक प्रतिकृती विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सादर केल्या आहेत.
उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार राणे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वैज्ञानिक प्रतिकृती कौतुकास्पद आहेत. मानवी जीवनात विज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून सकारात्मक वाटचाल करावी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नवनवीन संशोधक घडले पाहिजेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. जिल्ह्यात विज्ञान संशोधनासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने सायन्स रिसर्च सेंटर उभारण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी कुडाळ पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक, संजू परब, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम (दादा) साईल, शिक्षण व आरोग्य समिती सभापती प्रितेश राऊळ, उपसभापती सिताराम तेली, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, जिल्हा परिषद सदस्य आरती पाटील, नागेश आईर, रूपेश कानडे, पंचायत समिती सदस्य मंगेश प्रभू, निखिल कांदळगावकर, अर्चना घावनळकर, बिबवणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजाराम सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र मेस्त्री, सरपंच सृष्टी कुडपकर, उपसरपंच दीपक सावंत आणि गटशिक्षणाधिकारी कैलास राऊत आदी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष राजाराम सावंत आणि मुख्याध्यापक भास्कर पारधी यांच्या हस्ते आमदार निलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर आमदार राणे यांनी प्रदर्शनातील विविध वैज्ञानिक प्रतिकृतींची पाहणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रयोगांची माहिती घेतली आणि त्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी स्वागतगीत आणि ईशस्तवन सादर केले. गटशिक्षणाधिकारी कैलास राऊत यांनी प्रास्ताविक केले. अंकुश कदम यांनी सूत्रसंचालन केले, तर मुख्याध्यापक भास्कर पारधी यांनी आभार मानले. या दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप शुक्रवारी, २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे.











