संविधानातील हक्क, अधिकार आणि मूल्यांविषयी मार्गदर्शन; गावागावांत संविधान जागृती कार्यक्रम राबविण्याचे नियोजन
मालवण (प्रतिनिधी) : भारतीय बौद्ध महासभा तालुका मालवण यांच्या वतीने डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवन, कट्टा येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेले हक्क, अधिकार आणि लोकशाही मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष रविकांत कदम, सरचिटणीस नचिकेत पवार, संस्कार उपाध्यक्ष सूर्यकांत कदम, बार्टीचे मालवण समतादूत संग्राम कासले, पर्यटन सचिव संदीप कदम, राजाराम कदम, वैभव पवार आदी उपस्थित होते.
यावेळी बार्टीचे समतादूत संग्राम कासले यांनी उपस्थितांना भारतीय संविधानातील मूलभूत हक्क, नागरिकांचे अधिकार आणि संविधानाने अधोरेखित केलेली मूल्ये याबाबत मार्गदर्शन केले. संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेची हमी देणारा महत्त्वपूर्ण दस्तऐवज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संविधानातील तरतुदींची माहिती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस नचिकेत पवार यांनी संविधानाचा प्रचार आणि प्रसार अधिक व्यापक करण्यासाठी गावपातळीवर प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. तालुक्यातील विविध गाव शाखांच्या माध्यमातून संविधान जागृतीविषयक कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येणार असून, नागरिकांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून संविधानिक मूल्यांची जपणूक आणि त्यांचा समाजात प्रसार करण्याचा संदेश देण्यात आला.










