सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ लाख ३७ हजार खातेदारांपैकी १ लाख ९० हजार शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे अनिवार्य करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ३ लाख ३७ हजार ३८१ खातेदारांपैकी आतापर्यंत १ लाख ९० हजार ९२१ शेतकऱ्यांनी फार्मर आयडीची नोंदणी पूर्ण केली आहे. अद्याप नोंदणी न केलेल्या शेतकरी बांधव-भगिनींनी कोणताही विलंब न करता फार्मर आयडी काढून घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
राज्य शासनाकडून १४ नोव्हेंबर २०२४ पासून अॅग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार १५ एप्रिल २०२५ पासून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या नोंदणी प्रक्रियेला प्राधान्य देणे आवश्यक आहे.
यापुढे कृषी विभागाच्या विविध योजना, महाडीबीटीअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना, पीक नुकसान भरपाई अनुदान, पीक विमा योजना, नमो किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी तसेच राष्ट्रीय फलोत्पादन अभियान यांसारख्या योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक राहणार आहे.
अशी करा फार्मर आयडी नोंदणी
फार्मर आयडी तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना दोन पर्याय उपलब्ध आहेत. आपल्या नजीकच्या सामाईक सुविधा केंद्रामार्फत (CSC) ऑनलाइन नोंदणी करता येईल. तसेच अॅग्रीस्टॅक पोर्टलवरून शेतकरी स्वतःही ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
शासनाच्या कृषीविषयक योजनांचा लाभ घेताना भविष्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील अद्याप फार्मर आयडी न काढलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
महत्त्वाची आकडेवारी
- एकूण खातेदार : ३,३७,३८१
- फार्मर आयडी नोंदणी पूर्ण : १,९०,९२१
- अद्याप नोंदणी बाकी : १,४६,४६०
नोंदणी पूर्ण झालेल्या खातेदारांचे प्रमाण सुमारे ५६.५ टक्के आहे.











