महिला पालकांच्या नृत्य सादरीकरणाने चिमुकल्यांचा आनंद द्विगुणित
मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहरातील आशादीप नर्सरीमध्ये शुक्रवारी, २७ नोव्हेंबर रोजी बालदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात चिमुकल्यांच्या आनंदासाठी महिला पालकांनी सादर केलेल्या नृत्याने विशेष रंगत आणली.
या कार्यक्रमात आशादीप नर्सरीतील शिशुंच्या महिला पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत नृत्य सादरीकरण केले. सिस्टर फातिमा यांच्यासह नझिरा शेख, चैताली आचरेकर, स्नेहल सिंनकर, नम्रता लुडबे, सिद्धी सामंत, सुप्रिया परब, मनस्वी धुरी, ऋता धुरी, जेसिन्ता फर्नांडिस, लॅन्सी सोज आणि जॉयस रॉड्रिक्स यांनी नृत्य सादर केले. पालकांच्या या सहभागामुळे बालदिनाचा आनंद अधिकच द्विगुणित झाला.
यावेळी शिक्षिका सिस्टर फातिमा, मीना लुगेरा, सिस्टर रोझा, सिस्टर शांती यांच्यासह आशादीप नर्सरीमधील चिमुकल्यांचे पालक उपस्थित होते. उत्साह, आनंद आणि पालकांच्या सहभागाने हा बालदिन सोहळा आनंदात पार पडला.











