मालवण : सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून साहित्याचा आशय नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित ‘साहित्ययात्री रील’ स्पर्धेत तन्मय नाईक यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पारंपरिक साहित्यप्रसाराला आधुनिक डिजिटल अभिव्यक्तीची जोड देणारी ही स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्य ठरली.
१५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित या स्पर्धेत तन्मय नाईक यांना प्रथम क्रमांकासाठी चार हजार ५०० रुपये रोख आणि ५०० रुपयांची ग्रंथभेट देण्यात येणार आहे. शिवराज सावंत यांनी द्वितीय क्रमांक मिळविला असून त्यांना दोन हजार ५०० रुपये रोख आणि ५०० रुपयांची ग्रंथभेट मिळणार आहे.
वरद प्रभू यांनी तृतीय क्रमांक पटकावला. त्यांना एक हजार ५०० रुपये रोख आणि ५०० रुपयांची ग्रंथभेट देण्यात येणार आहे. तनश्री चव्हाण आणि मृणाल पाटकर यांना उत्तेजनार्थ स्थान मिळाले असून त्यांना ग्रंथभेट आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत १७ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. सोशल मीडिया प्रभावक लक्ष्मीकांत कांबळी, मनोज उर्फ लारा मयेकर आणि गौरेश कांबळी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
जिल्ह्यातील साहित्यिक, साहित्यकृती आणि साहित्यविषयक आशय रीलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचा या स्पर्धेचा उद्देश होता. डिजिटल माध्यमांमधून मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.









