गुड मॉर्निंग क्रिकेट संघाचा सलग दहाव्या वर्षी संविधान शपथ उपक्रम; बोर्डिंग मैदानावर संविधान दिन साजरा
मालवण (प्रतिनिधी) : भारतीय संविधान हे प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा अधिकार देणारे सर्वोच्च मार्गदर्शक आहे. संविधानाने दिलेले अधिकार समजून घेतानाच प्रत्येकाने आपल्या कर्तव्यांचीही जाणीव ठेवणे आवश्यक आहे. लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी संविधानातील मूल्ये केवळ पुस्तकापुरती मर्यादित न ठेवता ती दैनंदिन जीवनात आचरणात आणली पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ खेळाडू नितीन वाळके यांनी केले.
भारतीय संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये आणि नागरिकांची कर्तव्ये यांची जाणीव समाजात निर्माण व्हावी, या उद्देशाने मालवण येथील बोर्डिंग मैदानावर भारतीय संविधान दिनानिमित्त गुड मॉर्निंग क्रिकेट संघाच्या वतीने संविधान शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गुड मॉर्निंग क्रिकेट संघाच्या वतीने सलग दहा वर्षे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदाही संघाच्या सदस्यांनी एकत्र येत भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील मूल्यांचे स्मरण केले आणि संविधाननिष्ठ राहण्याची शपथ घेतली.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नितीन वाळके यांनी संविधानाचे महत्त्व विशद केले. संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे. समाजात जात, धर्म, भाषा किंवा अन्य कोणत्याही आधारावर भेदभाव न करता बंधुभाव जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. संविधानाचा आदर करणे आणि त्यातील मूल्यांचे पालन करणे ही केवळ औपचारिकता नसून प्रत्येक नागरिकाने स्वीकारलेली जीवनशैली असली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने संविधान दिनानिमित्त शपथ उपक्रम राबविणाऱ्या गुड मॉर्निंग क्रिकेट संघाच्या या उपक्रमातून क्रीडांगणावरही लोकशाही मूल्यांचा जागर केला जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले.










