मालवण : पारंपरिक उखाण्यांची संस्कृती जतन करण्यासोबतच महिलांमधील कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि लोकसाहित्याचा प्रसार व्हावा, या उद्देशाने आयोजित उखाणे स्पर्धेत मधुरा महेश गोवेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना पैठणी देऊन गौरविण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलनानिमित्त २५ ऑक्टोबर २०२६ रोजी महिलांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मानसी मिटकर आणि नंदिनी सुतार यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. त्यांना कोल्हापुरी साज देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
वैशाली सावजी आणि मैत्रेयी बांदेकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. त्यांना हँडबॅग देण्यात येणार आहे. अश्विनी आचरेकर आणि वैष्णवी आचरेकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून पाऊच देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत ५४ महिलांनी सहभाग नोंदविला. प्रा. डॉ. सुमेधा नाईक आणि प्रा. डॉ. ज्योती बुवा तोरसकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
उखाण्यांच्या माध्यमातून मराठी भाषेतील शब्दवैभव, विनोदबुद्धी, कल्पकता आणि पारंपरिक लोकसंस्कृतीचे दर्शन घडले. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर लोकपरंपरेलाही स्थान देण्यात आल्याने या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.












