कणकवली (प्रतिनिधी) — भारतीय लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि इंडिया आघाडीच्या वतीने मुंबईत काढण्यात आलेल्या ‘गर्जना’ मोर्चाला सामान्य नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विशेषतः तरुणाई आणि जनरेशन-झेडमधील नागरिकांनी मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला.
निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता, जनतेच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सध्या सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) प्रक्रियेवरही मोर्चाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करण्यात आले. ही प्रक्रिया रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही आंदोलकांकडून करण्यात आली.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर मुंबईतील या मोर्चाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले होते. इंडिया आघाडीतील विविध घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिक मोर्चात सहभागी झाले.
सिंधुदुर्गातूनही सहभाग
या ‘गर्जना’ मोर्चात सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही शिवसेना आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक नागरिक सहभागी झाले. कणकवली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष तथा युवासेना जिल्हा युवा अधिकारी सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोर्चात सहभाग नोंदविला.
यावेळी उपनेत्या जान्हवीताई सावंत, गणेश गावकर, अनंत पाटकर, जिगीषा सावंत, जिग्निशा सावंत, विठ्ठल तांडेल, दिपेश आंगणे, निलेश शिंदे यांच्यासह सिंधुदुर्गातील अनेक नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, लोकशाही, संविधान आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून मुंबईत निघालेल्या या मोर्चामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.











