आमदार निलेश राणे यांनीही खेळाडूंसमवेत लुटला टेबल टेनिसचा आनंद; आठ जिल्ह्यांतील २४० खेळाडूंचा सहभाग
मालवण (प्रतिनिधी) : महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन, सिंधुदुर्गच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कोकण व पश्चिम महाराष्ट्र विभागीय टेबल टेनिस स्पर्धा २०२६ मालवण-कुंभारमाठ येथील माघी गणेश मंगल कार्यालयात उत्साहात पार पडली. स्पर्धेच्या महिला खुल्या गटात कोल्हापूरच्या निहाली पाटीलने, तर पुरुष खुल्या गटात रायगडच्या प्रियांकुश बोसने विजेतेपद पटकावले. रायगडचा दिव्यांग खेळाडू प्रमोदकुमार याने पुरुष खुल्या गटाच्या अंतिम फेरीत धडक मारत आपल्या जिद्दीने आणि खेळातील कौशल्याने उपस्थितांची वाहवा मिळवली.
स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनचे खजिनदार तथा स्पर्धेचे अध्यक्ष संजय कडू, विभागीय स्पर्धा आयोजक सचिव हेमंत वालकर, मॅनेजिंग कमिटी सदस्य तथा रत्नागिरी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष अजित गाळवणकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, महासिंधु टेबल टेनिस असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष विष्णू कोरगांवकर, उपाध्यक्ष किरण पिंगुळकर, सहसचिव दीपक जाधव, विलास परुळेकर, दिलीप हुनारी, सतीश पिंगळे, पी. एस. शिंदे, नितीन तळेकर, पंकज पेडणेकर, गुरुनाथ राणे आदी उपस्थित होते.
आमदार निलेश राणे यांनी खेळाडूंसोबत खेळला टेबल टेनिस
स्पर्धेला आमदार निलेश राणे यांनी भेट देऊन सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल त्यांनी महासिंधु टेबल टेनिस असोसिएशनचे अभिनंदन केले. यावेळी आमदार निलेश राणे यांनी स्वतः खेळाडूंसमवेत टेबल टेनिस खेळत खेळाचा आनंद घेतला. यावेळी दत्ता सामंत व मंदार लुडबे उपस्थित होते.
आठ जिल्ह्यांतील २४० खेळाडूंचा सहभाग
या स्पर्धेत १४ गटांमध्ये सामने खेळविण्यात आले. कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या आठ जिल्ह्यांतील तब्बल २४० खेळाडूंनी सहभाग घेतला. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षक, पालक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेतील प्रमुख निकाल
- ११ वर्षांखालील मुले : विजेता – रणवीर जाधव (कोल्हापूर), उपविजेता – संयम चव्हाण (कोल्हापूर)
- ११ वर्षांखालील मुली : विजेती – श्रेया माईन (सातारा), उपविजेती – विभा घाडगे (सातारा)
- १३ वर्षांखालील मुले : विजेता – आरव सरदेशमुख (सातारा), उपविजेता – अक्षित ऐनापुरे (सोलापूर)
- १३ वर्षांखालील मुली : विजेती – श्रावणी माईन (सातारा), उपविजेती – समृद्धी मनवेलकर (कोल्हापूर)
- १५ वर्षांखालील मुले : विजेता – राजवीर साळोखे (कोल्हापूर), उपविजेता – जुनेद मगदूम (कोल्हापूर)
- १५ वर्षांखालील मुली : विजेती – गीत जगताप (कोल्हापूर), उपविजेती – श्रावणी माईन (सातारा)
- १७ वर्षांखालील मुले : विजेता – वेदांत खालाडे (सोलापूर), उपविजेता – जुनेद मगदूम (कोल्हापूर)
- १७ वर्षांखालील मुली : विजेती – गीत जगताप (कोल्हापूर), उपविजेती – वर्षा परुळेकर (सिंधुदुर्ग)
- १९ वर्षांखालील मुले : विजेता – वेदांत खालाडे (सोलापूर), उपविजेता – अवधूत चौधरी (सोलापूर)
- १९ वर्षांखालील मुली : विजेती – अनन्या जोशी (कोल्हापूर), उपविजेती – निहाली पाटील (कोल्हापूर)
- खुला पुरुष गट : विजेता – प्रियांकुश बोस (रायगड), उपविजेता – प्रमोदकुमार (रायगड)
- खुला महिला गट : विजेती – निहाली पाटील (कोल्हापूर), उपविजेती – अनन्या जोशी (कोल्हापूर)
विजेत्यांचा गौरव
विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना संजय कडू, हेमंत वालकर, विष्णू कोरगांवकर, रुजारिओ पिंटो, दिलीप हुनारी, महेश तळवडेकर, किरण पिंगुळकर, मंदार लुडबे आणि नितीन तळेकर यांच्या हस्ते रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात आले. रोख पारितोषिके दत्ता सामंत यांनी, तर चषक मंदार ओरसकर यांनी पुरस्कृत केले.
स्पर्धेच्या आयोजनासाठी आमदार रवींद्र चव्हाण, दत्ता सामंत, मंदार लुडबे, संजय लुडबे, जयंत गवंडे, जानकी मंगल कार्यालय, प्रांजल होमस्टे, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक, जीएसटीपीए महाराष्ट्र, साना होम्स प्रायव्हेट लिमिटेड, चिरंजीव प्रॉडक्ट, कोरगांवकर मालवण टेबल टेनिस अकॅडमी, महेश तळवडेकर, रुजारिओ पिंटो आणि डॉ. संजय पाटील यांचे योगदान लाभले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विलास परुळेकर, चंद्रकांत साळवे, गुरुनाथ राणे, दिलीप हुनारी आणि पंकज पेडणेकर यांनी सहकार्य केले. मुख्य पंच म्हणून रोहित शिंदे, तंत्रज्ञ म्हणून सतीश पिंगळे, तर पंच म्हणून पराग अंकोलेकर व गोपाळ बावसकर यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन डी. डी. जाधव यांनी केले, तर आभार हेमंत वालकर यांनी मानले.









