तीनही विजेते संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड; २० शाळांचा सहभाग
मालवण (प्रतिनिधी) : दमदार सर्व्हिस, आक्रमक स्मॅश आणि प्रत्येक गुणासाठी रंगलेली चुरस… अशा उत्साहपूर्ण वातावरणात मालवण तालुकास्तरीय शालेय शासकीय व्हॉलीबॉल स्पर्धा जनता विद्या मंदिर, त्रिंबक प्रशालेच्या मैदानावर उत्साहात पार पडल्या. तालुक्यातील सुमारे २० शाळांच्या संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. तीन गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत विजेतेपद मिळविणाऱ्या त्रिंबक, टोपीवाला हायस्कूल आणि इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा या संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
ही स्पर्धा गुरुवारी, २ ऑक्टोबर रोजी जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशालेच्या मैदानावर घेण्यात आली. स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी उत्कृष्ट क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन करत सामन्यांमध्ये चुरस निर्माण केली.
तीन गटांत रंगले सामने
स्पर्धेचे सामने १४ वर्षांखालील मुली, १४ वर्षांखालील मुले आणि १९ वर्षांखालील मुले अशा तीन गटांत घेण्यात आले.
१४ वर्षांखालील मुलींच्या गटात जनता विद्या मंदिर, त्रिंबकच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात टोपीवाला हायस्कूल, मालवणच्या संघाने विजेतेपद मिळविले. तर १९ वर्षांखालील मुलांच्या गटात इंग्लिश मीडियम स्कूल, कट्टा संघाने प्रथम क्रमांक मिळवत बाजी मारली.
या तिन्ही विजेत्या संघांची आता जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी मालवण तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे.
मान्यवरांची उपस्थिती
स्पर्धेचे उद्घाटन माध्यमिक शिक्षण समितीचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ अन्ना सकपाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समितीचे कार्यवाह अरविंद घाडी, उपाध्यक्ष अशोक बागवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल प्रभू, संचालक डॉ. सुधीर मेहेंदळे, एकनाथ घाडीगांवकर, संजय सामंत, राजू त्रिंबककर, सच्चिदानंद भोगटे, प्रशालेचे मुख्याध्यापक प्रवीण घाडीगावकर, क्रीडा समन्वयक संजय पेंडुरकर यांच्यासह मालवण तालुक्यातील क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
स्पर्धेतील पंच म्हणून अमित हर्डीकर, महेंद्र वारंग, श्यामसुंदर वारंग, संतोष तावडे आणि निशिकांत पराडकर यांनी काम पाहिले. क्रीडा शिक्षक महेंद्र वारंग यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशालेतील शिक्षक, क्रीडा शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली. तालुकास्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या तिन्ही विजेत्या संघांकडून आता जिल्हास्तरीय स्पर्धेतही उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.












