सिंधुदुर्ग, दि. ५ : राज्यातील असंसर्गजन्य आजारांचे (NCDs) वाढते प्रमाण लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘तिशीचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ हे १०० दिवसांचे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. १ सप्टेंबर ते १० डिसेंबर २०२६ या कालावधीत सुरू असलेल्या या अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३० वर्षांवरील नागरिकांची घरोघरी तसेच आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी केली जात आहे. आजारांचे लवकर निदान, योग्य उपचार आणि संभाव्य गुंतागुंत टाळण्यावर अभियानात विशेष भर देण्यात आला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत आरोग्य पथकांमार्फत मोठ्या प्रमाणावर नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये मधुमेहासाठी ६३ हजार ३०५, उच्च रक्तदाबासाठी ६४ हजार २५१, तोंडाच्या कर्करोगासाठी ५८ हजार ४६१, स्तन कर्करोगासाठी २४ हजार १२६ आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी ११ हजार ५८५ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. ही आकडेवारी असंसर्गजन्य आजारांचे वेळेत निदान करण्यासाठी सुरू असलेल्या व्यापक आरोग्य तपासणीचे चित्र स्पष्ट करते.
घरोघरी सर्वेक्षणातून पात्र नागरिकांची यादी
अभियानाचा महत्त्वाचा भाग म्हणून आशा स्वयंसेविकांमार्फत ३० वर्षांवरील नागरिकांचे घरोघरी सर्वेक्षण केले जात आहे. गेल्या एक वर्षात मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाची तपासणी न झालेले तसेच गेल्या पाच वर्षांत कर्करोगाची तपासणी न झालेले नागरिक शोधून त्यांची स्वतंत्र यादी तयार केली जात आहे. त्यानंतर संबंधित नागरिकांची आवश्यक आरोग्य तपासणी करून पुढील उपचारासाठी मार्गदर्शन केले जात आहे.
गाव आणि वॉर्ड पातळीवर आरोग्य पथके
प्रत्येक गाव आणि वॉर्ड पातळीवर आशा, एएनएम, एमपीडब्ल्यू आणि समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) यांच्या माध्यमातून विशेष आरोग्य पथके कार्यरत आहेत. या पथकांकडून नागरिकांची प्राथमिक तपासणी करून आजाराची शक्यता असलेल्या व्यक्तींना पुढील निदानासाठी आरोग्य यंत्रणेकडे पाठविले जात आहे.
उच्च रक्तदाबासाठी रक्तदाब मोजणी, मधुमेहासाठी रक्तातील साखरेची (RBS) तपासणी केली जात आहे. महिलांसाठी गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या निदानासाठी VIA चाचणी, स्तन कर्करोगासाठी स्तनातील गाठींची तपासणी, तर तोंडाच्या कर्करोगासाठी तोंडातील संशयास्पद विकृतींची तपासणी केली जात आहे. तंबाखू सेवन करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्य तपासणीलाही अभियानात विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
संशयित रुग्णांना पुढील तपासणी व उपचार
प्राथमिक तपासणीदरम्यान आजाराची शक्यता आढळलेल्या नागरिकांना पुढील निदानासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात संदर्भित केले जाते. आवश्यकतेनुसार मॅमोग्राफी, बायोप्सी, FNAC यांसारख्या पुढील तपासण्या तसेच उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.
असंसर्गजन्य आजारांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा स्पष्ट लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे नियमित तपासणीच्या माध्यमातून आजाराचे लवकर निदान होणे महत्त्वाचे ठरते. मधुमेह आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात न राहिल्यास हृदयविकार, मूत्रपिंडाचे विकार, स्ट्रोक यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास उपचाराच्या पर्यायांमध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे या अभियानाच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीला प्राधान्य देण्यात आले आहे.
३० वर्षांवरील नागरिकांनी तपासणीचा लाभ घ्यावा
‘लवकर तपासणी, योग्य निदान आणि वेळेवर उपचार’ या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा ३० वर्षांवरील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे. नागरिकांनी आपल्या जवळच्या आरोग्यवर्धिनी केंद्रात किंवा गावात येणाऱ्या आरोग्य पथकाकडून आरोग्य तपासणी करून घ्यावी, असेही त्यांनी सांगितले आहे.
नियमित आरोग्य तपासणी ही केवळ आजाराचे निदान करण्यापुरती मर्यादित नसून, आजार होण्यापूर्वीच जोखीम ओळखून जीवनशैलीत आवश्यक बदल करण्याची संधी देते. त्यामुळे ३० वर्षांवरील नागरिकांनी अभियानात सहभागी होऊन आपली आरोग्य तपासणी करून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.










