मालवण (प्रतिनिधी) : मालवण-बेळणे मार्गावर वीज वितरण कंपनीमार्फत सुरू असलेल्या भूमिगत वीजवाहिनीच्या कामाच्या दर्जावरून मालवण पंचायत समितीच्या मासिक सभेत वीज अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. हे काम अत्यंत निकृष्ट व निष्काळजीपणे सुरू असल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य दीपक उर्फ बंडू चव्हाण यांनी केला. वारंवार तक्रारी करूनही कामात सुधारणा होत नसल्याने ‘वीज अधिकारी ठेकेदाराचे जावई म्हणून काम करत आहेत का?’ असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
मालवण पंचायत समितीची मासिक सभा सभापती प्रज्ञा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती घनश्याम झाड, गटविकास अधिकारी परागिनी पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. सावंत, पंचायत समिती सदस्य दीपक चव्हाण, छोटू ठाकूर, सीमा परुळेकर, मानसी भोगावकर, रिया बावकर, माधुरी मसुरकर, संतोष गावडे, दीपक सुर्वे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कामाच्या दर्जावरून अधिकाऱ्यांना जाब
सभेत दीपक चव्हाण यांनी मालवण-बेळणे मार्गावर सुरू असलेल्या भूमिगत वीजवाहिनीच्या कामाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. खोदाई केल्यानंतर त्यामध्ये वीजवाहिनी टाकताना नियमानुसार वाळूचा थर टाकला जात नसल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भातील व्हिडीओ आणि छायाचित्रे सभागृहात सादर करून कामाच्या दर्जाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
वीजवाहिनीचे काम सुरू असताना त्यावर देखरेख करण्यासाठी जबाबदार अधिकारी प्रत्यक्ष ठिकाणी दिसून येत नसल्याचे सभापती प्रज्ञा चव्हाण यांनीही निदर्शनास आणून दिले. ठेकेदाराकडून चुकीच्या पद्धतीने काम होत असल्यास त्याच्यावर कारवाई का केली जात नाही, असा सवालही सभेत उपस्थित करण्यात आला.
‘आराखड्यानुसार काम झाले पाहिजे’
भूमिगत वीजवाहिनीचे काम नियोजित आराखड्यानुसार आणि निर्धारित निकषांनुसारच झाले पाहिजे, अशी मागणी दीपक चव्हाण यांनी केली. कामात निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदाराबरोबरच त्यावर देखरेख करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
वीज अधिकाऱ्यांकडे यापूर्वीही कामाबाबत तक्रारी आणि सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही कामाच्या पद्धतीत सुधारणा झालेली नाही, असा आरोप चव्हाण यांनी केला. त्यामुळे संबंधित विभागाने या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा दर्जा तपासावा आणि दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी सभेत करण्यात आली.
दुष्काळी परिस्थितीवरही चर्चा
दरम्यान, पंचायत समितीच्या बैठकीत तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेण्यात आली. ट्रिगर-१ अंतर्गत मालवण तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश झाल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.
दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व विभागांनी समन्वयाने दुष्काळ निवारणासाठी काम करावे, अशा सूचना सभापती प्रज्ञा चव्हाण यांनी दिल्या. संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी गावागावात देण्यात आलेल्या उद्दिष्टानुसार वनराई बंधारे उभारावेत, यासाठी नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी श्रमदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रशासनाने ज्या वनराई बंधाऱ्यांची दुरुस्ती आवश्यक आहे, त्या ठिकाणी तातडीने दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशा सूचनाही सभापतींनी दिल्या. त्यामुळे वीजवाहिनीच्या कामाच्या दर्जाबरोबरच आगामी काळातील पाणीटंचाई आणि दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांवरही सभेत सविस्तर चर्चा झाली.











