लोकनृत्य, लोकगीत, कवितालेखन, चित्रकला व पथनाट्य स्पर्धांचा समावेश; १५ ते २९ वयोगटातील युवक-युवतींना संधी
सिंधुदुर्ग, दि. ५ : क्रीडा विभागाच्या वतीने सन २०२६-२७ या वर्षातील जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन नोव्हेंबर २०२६ च्या तिसऱ्या आठवड्यात करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय युवा महोत्सव समितीच्या अध्यक्षा तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव आयोजित केला जाणार असून, त्यासाठी इच्छुक युवक-युवतींनी १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय युवा महोत्सव २०२६-२७ साठी ‘सांस्कृतिक व विकसित भारत युवा नेतृत्व संवाद’ (Cultural Track and Viksit Bharat Young Leaders Dialogues Track) ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. या संकल्पनेवर आधारित जिल्हास्तरीय युवा महोत्सवात विविध सांस्कृतिक व सर्जनशील स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
पाच स्पर्धांचा समावेश
जिल्हास्तरीय युवा महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत, कवितालेखन, चित्रकला आणि पथनाट्य या पाच प्रमुख स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
लोकनृत्य आणि लोकगीत स्पर्धेसाठी प्रत्येकी १० सहभागी आणि स्वतंत्र साथसंगत, तर पथनाट्य स्पर्धेसाठी १० सहभागी असतील. कवितालेखन आणि चित्रकला या वैयक्तिक स्वरूपाच्या स्पर्धा असणार आहेत.
१५ ते २९ वयोगटातील युवकांना संधी
जिल्ह्यातील १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवतींना या महोत्सवात सहभागी होता येणार आहे. इच्छुक युवक-युवतींसह युवा मंडळे, महिला मंडळे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थी तसेच कृषी, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालये आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थी व संघांना सहभागी होता येणार आहे.
युवा महोत्सवाच्या माध्यमातून युवकांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळण्याबरोबरच सांस्कृतिक अभिव्यक्ती, सर्जनशीलता आणि नेतृत्वगुणांना चालना मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
१५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी
महोत्सवातील सहभागासाठी १ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन नोंदणी करावी. नोंदणीसाठी आयोजकांनी दिलेल्या Google Form चा वापर करावा. जिल्हास्तरीय युवा महोत्सवाची सविस्तर नियमावलीही याच ऑनलाइन लिंकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवती, युवा मंडळे आणि विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी व युवा संघांनी या महोत्सवात सहभागी होऊन आपले कलागुण सादर करावेत, असे आवाहन जिल्हास्तरीय युवा महोत्सव आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.












