संघटना मजबूत करण्यासाठी मोठ्या संख्येने सदस्य नोंदणीचे वैभव नाईक यांचे आवाहन
मालवण : प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ मालवण येथील शिवसेना शाखेत करण्यात आला. माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक आणि माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. जिल्ह्यात पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सदस्य नोंदणीत सहभागी व्हावे, असे आवाहन वैभव नाईक यांनी केले.
यावेळी वैभव नाईक यांनी पक्षाच्या भूमिकेवर भाष्य करताना सांगितले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ या ब्रीदाने कार्यरत आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी पक्षाने अनेकदा विरोधात राहून संघर्ष केला असून, सर्वसामान्यांच्या छोट्या-मोठ्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम शिवसेना करत असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना सातत्याने लढत असून, सत्तेसाठी किंवा राजकारणासाठी हिंदुत्वाचा गैरवापर केलेला नाही, असा दावाही नाईक यांनी केला. सत्ताधाऱ्यांच्या कारभाराविरोधात तरुण वर्ग विविध आंदोलनांच्या माध्यमातून आपला आवाज उठवत आहे. या आंदोलनांना न्याय देण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील राहील, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील तरुणांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही नाईक यांनी केले.
यावेळी मालवण शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक मंदार ओरसकर, महेंद्र म्हाडगुत, तपस्वी मयेकर, नगरसेविका अनिता गिरकर, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, महेश जावकर, महिला तालुका समन्वयक पूजा करलकर, शहर संघटिका राधिका मोंडकर, रूपा कुडाळकर, उमेश चव्हाण, सरपंच अमोल वस्त, सरपंच भगवान लुडबे, मयुर करंगुटकर, गौरी सावंत, पोईप उपविभागप्रमुख समीर लाड, छोटू सावजी, किशोर गावकर, मिनेश मयेकर, सुरेश मडये आदी शिवसैनिक उपस्थित होते.












