मालवण : प्रतिनिधी
कोकण विभागातील ग्रामपंचायतींच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून विकासाचा व्यापक आराखडा तयार करण्यासाठी कोकण विभाग सरपंच महापरिषद आयोजित करावी, अशी मागणी देवबाग ग्रामपंचायतीचे सरपंच उल्हास तांडेल यांनी आमदार निलेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोकणातील ग्रामविकासाशी संबंधित विविध विषयांवर सरपंचांना एकत्रित व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर कोकण विभागातील सरपंचांची महापरिषद आयोजित केल्यास स्थानिक पातळीवरील प्रश्न, अडचणी आणि विकासाच्या संधी यावर सविस्तर चर्चा करता येईल, असे तांडेल यांनी निवेदनात म्हटले आहे.
या महापरिषदेत कोकणातील पर्यटन, मच्छिमारी, आंबा-काजू व अन्य बागायती, ग्रामविकास, आरोग्य, शिक्षण तसेच कोकणची संस्कृती आणि परंपरा या विषयांवर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपातळीवरील लोकप्रतिनिधींचे अनुभव आणि सूचना महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आमदार निलेश राणे यांनी पुढाकार घेऊन कोकण विभाग सरपंच महापरिषद भरवावी, अशी मागणी सरपंच उल्हास तांडेल यांनी निवेदनातून केली आहे.












