मालवण (प्रतिनिधी) : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सुमारे ५० लाख रुपयांच्या निधीतून मालवण येथील चिवला बीच रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या कामाची मालवण नगरपरिषदेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर आणि आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी पाहणी केली. रस्त्याचे काम दर्जेदार साहित्याचा वापर करून नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित ठेकेदार आणि यंत्रणेला दिल्या.
चिवला बीच हे मालवणमधील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असून, या परिसरात स्थानिक नागरिकांसह पर्यटकांचीही मोठी वर्दळ असते. त्यामुळे येथील रस्ते सुस्थितीत आणि सुरक्षित असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर सुमारे ५० लाख रुपयांच्या निधीतून रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
या कामाचा लाभ नागरिक आणि पर्यटकांना दीर्घकाळ मिळावा, यासाठी कामाच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे बापर्डेकर आणि चव्हाण यांनी यावेळी सांगितले. सार्वजनिक निधीतून होणारी विकासकामे टिकाऊ आणि दर्जेदार झाली पाहिजेत. त्यामुळे कामात कोणतीही त्रुटी राहू नये, तसेच निर्धारित गुणवत्तेच्या निकषांनुसार काम पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.
चिवला बीच परिसरातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे वाहतुकीची सुविधा सुधारण्यास मदत होणार असून, पर्यटकांसाठीही हा मार्ग अधिक सोयीचा ठरण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे काम पूर्ण होईपर्यंत त्याच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याची भूमिका नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.












