१९ वर्षांखालील मुलांच्या गटात बाजी; विभागीय स्पर्धेसाठी संघाची निवड
मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने १९ वर्षांखालील मुलांच्या गटात विजेतेपद पटकावले. या यशामुळे महाविद्यालयाच्या संघाची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग, जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग आणि मालवण क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने टोपीवाला हायस्कूल, मालवण येथील बास्केटबॉल मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
१९ वर्षांखालील मुलांच्या गटात भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. या विजयामुळे आता विभागीय स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी संघाला मिळणार आहे.
या संघाला प्रा. गुरुदास दळवी आणि प्रा. स्नेहल पराडकर यांनी मार्गदर्शन केले, तर प्रा. पवन बांदेकर यांनी व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळली.
या यशाबद्दल भंडारी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य आर. डी. बनसोडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजेत्या संघातील सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.











